सर्वांनी मिळून संभाजीराजेंचा सन्मान करायला हवा होता. मात्र सगळ्या पक्षांनी आपला आपला निर्णय घेतला. संभाजी राजेंना यामुळे माघार घ्यावी लागली. याचं मला वाईट वाटतं आहे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. त्याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
‘मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती’; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार
ओबीसी आरक्षणाविषयी काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात सुटला नाही त्याला महाराष्ट्रातले अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित मंत्रालयाने व्यवस्थित डेटा कोर्टात दिला नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारने हे स्वीकारलं आहे की मध्य प्रदेश सरकारच्या धरतीवर महाराष्ट्रात ओबीसींचा डेटा तयार केला जाईल. राज्य सरकार जून महिन्यात हा डेटा सादर करणार आहे. हा डेटा आधी सादर केला असता तर निश्चितच आरक्षण मिळालं असतं असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
माझी ओळख शिवरायांच्या विचारांशी हाच माझा खरा ब्रांड-संभाजीराजे छत्रपती
दोन वर्ष कोरोनामुळे गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करता आली नाही. तरी यावर्षी तो कार्यक्रम साजरा होणार असून 3 जूनला मोठा कीर्तनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. काही सामाजिक उपक्रम देखील त्या दिवशी घेतले जातील अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
आज संभाजीराजे काय म्हणाले?
संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मागील १५ ते २० वर्षांपासून मी घर सोडून काम करतोय. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कुणी मला राज्यसभेत पाठवलं, हे न पाहता समाजाची भूमिका प्रांजळपणाने मांडली. हे सगळं लक्षात घेऊन मी सर्वांना राज्यसभेत पाठवण्याचं आवाहन केलं होतं,” असं संभाजीराजे म्हणाले.
“मला इतकं वाईट वाटतंय. मला मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी मला दिलेला शब्द मोडला. असो, स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी सज्ज झालोय. २००९ ची निवडणूक हरल्यानंतर मी राज्य पिंजून काढला.”
“माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही. माझी स्पर्धा माझ्यासोबतच आहे. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी उभा राहणार आहे. माझ्या अर्जावर सह्या करणाऱ्या आमदारांचे मी आभार मानतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. केव्हाही हाक त्यांनी द्यावी, संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेसाठी हजर असेन,” असं आश्वासन संभाजीराजेंनी दिलं असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT