राज्यसभा निवडणुकीची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून, दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. मात्र, त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्याप्रमाणेच अबू आझमी यांनीही त्यात भर घातली आहे.
ADVERTISEMENT
एकीकडे हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी इशारा दिलाय तर दुसरीकडे अल्पसंख्याक समाजासाठी काय केलं असा प्रश्न अबू आझमींनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
राज्यसभा निवडणुकीचं वातवरण चांगलंच तापलेलं असताना फोडाफोडी होऊ नये, योग्य ती सगळी खबरदारी घेतली जावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष आमदार होते.
साधारण ५५ आमदारांची या बैठकीला उपस्थिती होती. मात्र बच्चू कडू आणि अबू आझमी हे दोन आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हे अपक्ष आमदार होते ?
नरेंद्र भोंडेकर
चंद्रकांत पाटील
आशिष जैस्वाल
राजेंद्र पाटील यड्रावकर
शंकरराव गडाख
गीता जैन
मंजुळा गावित
किशोर जोरगेवार
या सगळ्यांमध्ये एक नाव आणखी चर्चेत राहिलं ते होतं आशिष जैस्वाल यांचं. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच आमदारांना निधी दिला जातो, असा गंभीर आरोप आशिष जैस्वाल यांनी केला होता. जैस्वाल यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार, समर्थन करणारे लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू असणार का? याची चर्चा रंगली होती. ते आले नाहीत त्यामुळे आता वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT