महाराष्ट्रापासून ते हरयाणापर्यंत आमदारांची ‘लपवाछपवी’!, 4 राज्यात का चुकलंय राज्यसभेचं गणित?

मुंबई तक

• 01:29 AM • 08 Jun 2022

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील राजकारण ढवळलं गेलंय. राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. चार राज्यांत चार जागांवर पेच अडकलेला असून, राजकीय पक्षांना घोडेबाजार आणि क्रॉस व्होटिंगची भीती सतावत आहे. त्यामुळेच आमदारांचा लपवाछपवी करण्यात राजकीय नेते बेजार झालेत. राजकीय पक्षाचं सगळं लक्ष्य सध्या राजसभा निवडणुकीवर केंद्रीत […]

Mumbaitak
follow google news

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील राजकारण ढवळलं गेलंय. राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. चार राज्यांत चार जागांवर पेच अडकलेला असून, राजकीय पक्षांना घोडेबाजार आणि क्रॉस व्होटिंगची भीती सतावत आहे. त्यामुळेच आमदारांचा लपवाछपवी करण्यात राजकीय नेते बेजार झालेत.

हे वाचलं का?

राजकीय पक्षाचं सगळं लक्ष्य सध्या राजसभा निवडणुकीवर केंद्रीत झालंय. त्यामुळेच महाराष्ट्र असो की हरयाणा… सगळी आमदारांना रिसॉर्ट, हॉटेलमध्ये ठेवण्यासाठीचीच धावपळ सुरूये. राजस्थानात काँग्रेसने पक्षातील आणि समर्थक आमदार उदयपूरच्या रिसॉर्टमध्ये ठेवले आहेत. तर भाजपने जयपूर बाहेर असलेल्या एका सिसॉर्टमध्ये. महाराष्ट्र, हरयाणा, कर्नाटकात यापेक्षा वेगळं चित्र नाहीये.

राज्यात काय आहे पेच?

राजस्थानात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात काँग्रेसला दोन, तर भाजपला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर चौथ्या जागेवरील भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांच्यामुळे पेच निर्माण झालाय.

हरयाणात राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणूक होणार आहे. एक जागा भाजप जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. तर दुसऱ्या जागेवर भाजप समर्थन असलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा आणि काँग्रेसचे अजय माकन यांच्यात लढत होत आहे.

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. चौथ्या जागेवर भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात लढत होत आहे.

महाराष्ट्रातही असंच चित्र आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. ६व्या जागेवर भाजप आणि शिवसेनेत लढत होत आहे.

राजस्थानात काय स्थिती?

सत्तेत असलेल्या राजस्थानात काँग्रेसने मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिलीये. भाजपने घनश्याम तिवारी यांनी उमेदवारी दिलीये, तर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिलाय.

काँग्रेसकडे १०८ आमदार आहे. त्यामुळे काँग्रेस दोन जागा सहज जिंकू शकते असं चित्र आहे. दोन जागांसाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण होऊन काँग्रेसकडे २२ मतं शिल्लक राहतात. तिसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला १५ मतांची गरज आहे. त्यामुळे तिन्ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला १२३ मतांची गरज आहे.

दुसरीकडे भाजपकडे ७१ आमदार आहेत. त्यामुळे भाजप एक जागा सहज जिंकू शकते. पण तरीही भाजपकडे ३० मतं जास्त आहेत. त्यामुळे आरएलपी आणि भाजप यांची मिळून ३३ मतं शिल्लक उरतात. त्यामुळे चंद्रा यांना विजयी होण्यासाठी ८ मतांचीच गरज आहे.

हरयाणातील दुसऱ्या जागेसाठी ‘फाईट’

हरयाणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा सहज जिंकू शकतात. अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी मात्र समीकरण बिघडवलं आहे. दुसऱ्या जागेमुळे घोडेबाजार होण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे काँग्रेस आपले आमदार थेट छत्तीसगढला पाठवलेत. कार्तिकेय शर्मा अजय माकन यांना चांगलं आव्हान देऊ शकतात.

९० सदस्य असलेल्या हरयाणा विधानसभेत काँग्रेसकडे ३१, तर भाजपकडे ४१ आमदार आहेत. त्यामुळे भाजपची १० मतं शिल्लक राहतात. भाजपचा मित्र पक्ष जेजेपीकडे १० आमदार आहेत. ६ अपक्ष आहेत, तर १ आमदार एचएलपी पार्टीचा आहे. त्यामुळे कार्तिकेय यांना २७ मतं मिळू शकतात.

कर्नाटकातील राज्यसभेचं गणित काय?

कर्नाटकात चार जागांसाठी मतदान होत आहे. चार उमेदवार सहज विजयी होतील, अशी स्थिती कर्नाटकात होती. पण काँग्रेसने मन्सूर अली यांना दुसरा उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं आहे. हे बघून भाजपनंही विधान परिषद आमदार लहर सिंह यांना तिसरा उमेदवार म्हणून तिकीट दिलंय.

२२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत राज्यसभेच्या एका जागेसाठी ४५ मतं आवश्यक आहे. काँग्रेसजवळ ७० आमदार आहेत. काँग्रेसने जयराम रमेश आणि मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिलीये. आता काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी २० मतं आवश्यक आहेत.

भाजपकडे १२१ आमदार आहेत. भाजपने निर्मला सीतारमन, कन्नड चित्रपट अभिनेते जग्गेश आणि लहर सिंह यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे भाजपलाही तिन्ही उमेदवार निवडणूक आणण्यासाठी १४ मतं आवश्यक आहेत. जेडीएसजवळ ३२ आमदार असून, जेडीएसने डी. कुपेंद्र रेड्डी यांनी उमेदवारी दिलीये. रेड्डी यांना जिंकून येण्यासाठी १३ आणखी मतं लागणार आहेत.

महाराष्ट्रात सहाव्या जागेचा पेच

महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होतेय. शिवसेना आणि भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिलीये. धनंजय महाडिक (भाजप) आणि संजय पवार (शिवसेना) यांच्यात सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या आमदारांना एकत्रित आणून तटबंदी केलीये. त्यामुळे या चारही राज्यात कळीच्या ठरलेल्या प्रत्येकी एका जागेवर कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

    follow whatsapp