काँग्रेसचे नेते तथा गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं होतं. काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा होती. त्यात रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
राजीव सातव यांचं कोरोना संसर्गाने निधन झालं. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असंही बोललं जात होतं. मात्र, अखेर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुकूल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आणि मिलिंद देवरा यांच्यापैकी काँग्रेसनं रजनी पाटील यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. रजनी पाटील यांच्याकडे जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणूनही जबाबदारी आहे.
कोण आहेत रजनी पाटील?
रजनी पाटील या काँग्रेसच्या माजी खासदार असून, काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वर्तुळातील विश्वासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. रजनी पाटील यांनी एनएसयूआय अर्थात राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती.
१९७८ ते ८१ काळात महाराष्ट्राच्या NSUI च्या सचिव होत्या. १९८१ ते ८३ च्या काळात त्यांच्याकडे ‘एनएसयूआय’च्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी आली. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा, केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्या अध्यक्षा आणि राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे.
१९९६ मध्ये खासदार गोपीनाथ मुंडे यांनी रजनी पाटील यांना भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या. 1998 मध्ये सोनिया गांधी राजकारणात सक्रीय होऊ लागल्यानंतर रजनी पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रजनी पाटील यांना विलासराव देशमुखांच्या निधनानंतर राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं.
राज्यसभेच्या या जागेसाठी भाजपने आधीच उमेदवार घोषित केला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच केली होती. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांचं नाव घोषित केलं होतं. संजय उपाध्याय हे मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. 22 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
ADVERTISEMENT