Rajya Sabha election राज्यसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. प्रस्ताव, चर्चा, बैठका यांचं सत्र शुक्रवारी (३ जून) दिवसभर रंगलं. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत काहीही ठोस पर्याय निघाला नाही. त्यामुळे निवडणूक होणारच हे स्पष्ट झालं.
ADVERTISEMENT
राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले होते. शिवसेना नेते अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनील केदार आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपला आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. विधान परिषदेसाठी १० जागांवर निवडणूक होणार आहे. संख्याबळ पाहिलं तर भाजपच्या चार जागा निश्चित मानल्या जात आहेत. मविआकडून भाजपला पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
तिसरा उमेदवार कायम ठेवण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम राहिले. भाजपने मविआने राज्यसभा निवडणूक बिनविरोध केल्यास विधान परिषदेसाठी पाचवी जागा लढवणार नसल्याचे म्हटले. भाजपने दिलेल्या या प्रस्तावावर महाविकास आघाडीत खल झाला. मात्र, शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार कायम ठेवण्याची भूमिका घेतली.
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 च्या आसपास मतांची आवश्यकता आहे.
राज्यसभा निवडणूक 2022 : नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदान करता येणार की नाही?
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
‘आता वेळ सुरु झालेली आहे. आता चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की, महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. आपण एकमेकांच्या सहमतीने ही निवडणूक लढवावी. कोणत्याही पद्धतीने घोडेबाजाराला वाव राहू नये यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
‘महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील’
‘महाविकास आघाडीचे नेते हे आज सकाळी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या घरी जाऊन भेटले. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील असतील. त्यांना त्यांच्या घरी जाऊन नेते भेटले. काही प्रस्तावाचं आदानप्रदान झालं. मला असं वाटतं की दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम आहे. भाजप त्यांचा उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. आणि शिवसेनेचे जे दुसरे उमेदवार आहेत संजय पवार हे सुद्धा रिंगणात आहेत. त्यामुळे आता जी काही प्रक्रिया आहे निवडणुकीची त्या प्रक्रियेला सामोरं जाणं आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला खात्री आहे की, आमचा सहावा उमेदवार सुद्धा निवडून येईल.’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
तो प्रस्ताव अखेर नामंजूर-चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी एक तासभर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊन आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठी ची दुसरी जागा मागे घ्या आणि विधान परिषदेची पाचवी जागा लढवणार नाही त्यानंतर कुठलाच संवाद माहाविकास आघाडीकडून झाला नाही.वेगळ्या बातम्या कानावर येत आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT