मुंबई: बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. (Raksha Bandhan) रक्षाबंधनाचा हाच सण आज (22 ऑगस्ट) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. खरं म्हणजे स्नेह, आदर व प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे. याच सणाच्या ‘मुंबई तक’कडून देखील मंगलमय शुभेच्छा.
ADVERTISEMENT
यंदा रक्षाबंधन रविवार (22 ऑगस्ट) साजरा केला जात आहे. भाऊ-बहिणीसाठी आजचा दिवस हा खूपच खास असतो. या सणाच्या दिवशी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्याने आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असावं आणि त्याला दिर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करते.
दरम्यान, याच सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त अनेक ठिकाणांहून त्यांच्या बहिणी प्रेमापोटी राखी पाठवत असतात. कोरोनाचं संकट उद्भवण्यापूर्वी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी हे अनेक छोट्या मुलींकडून राखी बांधून घेत असत. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट कायम असल्याने हा समारंभ झालेला नाही.
रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी, जिथे एकीकडे बहिणी आपल्या भावांना दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्याची शुभेच्छा देतात तर दुसरीकडे भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतो.
तब्बल 474 वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योग, तो देखील रक्षाबंधनाच्याच दिवशी!
राखी पौर्णिमेचा (Rakhi) सण हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि अतूट विश्वासाचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, बहिणी आणि भाऊ यांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर आणि इतर सोशल मीडियाद्वारे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन विशेष अभिनंदन संदेश पाठवून हा दिवस खास बनवू शकता.
महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेचा सणही जल्लोषात
दरम्यान, रक्षाबंधनासोबत महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेचा सण देखील अतिशय उत्साहात साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण विशेषत: कोळी आणि आगरी समाजातील नागरिक हे जल्लोषात साजरा करतात.
पावसाळा सुरु झाल्यानंतर कोळी बांधव हे साधारण चार महिने मासेमारी बंद ठेवतात. कारण या काळात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. मात्र, नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्याला नारळ अर्पण करुन कोळी बांधव हे पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळेच या कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
यावेळी मुंबईसह नजीकच्या अनेक कोळीवाड्यांमध्ये कोळी नागरिक समुद्रापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढतात आणि त्यानंतर दर्यात नारळ अर्पण करतात. याच दिवशी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये खास गोड नारळी भात देखील केला जातो.
ADVERTISEMENT