शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आज एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात होत्या. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या देवीचं दर्शन रश्मी ठाकरेंनी घेतलं. त्याचप्रमाणे पूजाअर्चा आणि आरतीही केली.
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या उभ्या फुटीनंतर रश्मी ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. ठाण्यात आल्यानंतर रश्मी ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं त्यानंतर ठाण्यातलं शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा दौरा ठरला.
शिवसेनेतल्या बंडानंतर राज ठाकरेंच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे?, काय म्हणाले राज?
रश्मी ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन
रश्मी ठाकरे या ठाण्यात येताच हजारो शिवसैनिक आणि महिला नेत्या एकवटल्या होत्या. टेंभी नाक्यावर देवीचं दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे या आनंद आश्रम या ठिकाणीही गेल्या होत्या. तिथे जाऊन रश्मी ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचंही दर्शन घेतलं. शिवसेनेतल्या बंडखोरीमुळे आणि राज्यातील सत्ताबदलाचं केंद्र ठरल्यामुळे ठाण्याची चर्चा तीन महिन्यात चांगलीच झाली.
शिवसेनेतल्या बंडानंतर राज ठाकरेंच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे?, काय म्हणाले राज?
धर्मवीर सिनेमाचीही ठाण्यात आणि राज्यात चर्चा
त्याआधी मे महिन्यात धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमाही आला होता. हा सिनेमा आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमाची चर्चाही ठाण्यात तसंच संपूर्ण राज्यभरात झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली ती या सिनेमापासून असंही बोललं जातं. याच ठाण्यात येऊन रश्मी ठाकरे यांनी शक्तीप्रदर्शन केलं.
आनंद दिघे यांनी सुरू केला ठाण्यातला नवरात्र उत्सव
ठाण्यातला नवरात्र उत्सव हा आनंद दिघे यांनी सुरू केला. या उत्सवाला बाळासाहेब ठाकरेही येत असत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येत असत. याच प्रमाणे आज रश्मी ठाकरे या ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी देवीची महाआरती केली. तसंच जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. रश्मी ठाकरे यांनी दुपारी ४.३० च्या दरम्यान देवीचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली.
मुंबईतल्या महिला आघाडीच्या नेत्या बसेसने या ठिकाणी आल्या होत्या. माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरेंसह ठाण्यात उपस्थिती दर्शवली. शिवसेनेचे खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे हेही उपस्थित होते. महाआरतीनंतर यावेळी महिला शिवसेनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
ADVERTISEMENT