राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या अनिल परबांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये निलंबीत RTO अधिकाऱ्याने परब आणि परिवहन आयुक्तांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. यानंतर दापोलीतील परब यांच्या साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणातही आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या CEO डॉ. इंदुराणी जखड आणि दापोलीचे प्रांताधिकारी ही चौकशी करणार आहेत. रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोलीतील अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट बांधकामाप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली होती. कोविड काळात परब यांनी दापोलीत अवैध पद्धतीने १० कोटींचं रिसॉर्ट बांधकाम केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे.
साई रिस़ॉर्टचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बांधकामादरम्यान CRZ चं उल्लंघन, फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष इत्यादी तक्रारी नमूद करत सोमय्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यावेळी मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोगही केल्याचं सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. किरीट सोमय्यांची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अनिल परबांची चौकशी होऊन अहवाल काय येतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे.
माझ्याविरोधातली तक्रार पूर्णपणे निराधार ! भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अनिल परबांचं स्पष्टीकरण
ADVERTISEMENT