अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टीतल्या (Rave Party) सहभागाबाबत आणि अंमली पदार्थांचं (Drugs) सेवन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रात रेव्ह पार्टीचं फॅड अनेक वर्षांपासून आलं आहे.
ADVERTISEMENT
काही वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी झालेलं रेव्ह पार्टीचं प्रकरण राज्यभरात गाजलं होतं. आधी या पार्ट्या खुलेआम होत असत. आता या पार्ट्या लपूनछपून होतात आणि त्यासाठी काही विशिष्ट कोडवर्डही तयार केले जातात. आपण समजून घेणार आहोत रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?
रेव्ह पार्टी म्हणजे काय?
रेव्ह पार्टीत खासकरून म्युझिक, डान्स आणि अंमली पदार्थांचा वापर केला जातो. तसंच काही पार्ट्यांमध्ये सेक्सही चालतो. ड्रग्जचं सेवन, म्युझिक, डान्स मस्ती आणि सेक्स या सगळ्यांचा एकत्रिक कॉम्बो म्हणजे रेव्ह पार्टी. या रेव्ह पार्ट्या पूर्वी खुल्या जागेत पण सहसा कुणाचं लक्ष जाणार नाही अशा चालायच्या. त्याच्यावर पोलिसांचे छापे पडू लागल्याने आता या पार्ट्या बंदीस्त जागेत होतात.
हायप्रोफाईल मॉडेल्स, फॅशन क्षेत्रातले लोक, सेलिब्रिटी असे लोक या पार्ट्यांना हजेरी लावत असतात. मात्र ही पार्टी कधी कुठे कशी होणार आहे याची माहिती फक्त ठराविक लोकांनाच असते. आपल्या सर्कलच्या बाहेर ही माहिती कुणीही जाऊ देत नाही. याचं महत्त्वाचं कारण असतं या पार्ट्यांमध्ये होणारा अंमली पदार्थांचा वापर आणि सेक्स. या दोन गोष्टी धाड टाकण्याला, तुरुंगात जायला पुरेशा ठरू शकतात. त्यामुळे अशा पार्टीजची खबर कुणालाही कानोकान नसते. या पार्टीज गुप्त स्वरूपात ठरवल्या जातात आणि पार पडल्या जातात.
Rave हा शब्द कुठून आला?
Rave हा शब्द एका जमैकन शब्दावर बेतलेला आहे. 80 च्या दशकात या पार्टीज काही प्रमाणात सुरू झाल्या होत्या. मात्र भारतात त्याचं पेव उशिरा फुटलं. रात्रभर पार्टी करणं, म्युझिक ऐकणं यात बेकायदेशीर असं काहीच नाही. यातला पुढचा भाग म्हणजेच अंमली पदार्थांचा वापर आणि सेक्स या दोन गोष्टी मात्र बेकायदेशीर ठरतात. त्यामुळेच अशा पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असते आणि त्या पार्ट्यांची माहिती मिळाली तर त्यांच्यावर धाड टाकली जाते आणि अटकेची कारवाई होते.
कुठे कुठे चालतात पार्टीज आणि काय चालतं त्यात?
मुंबई, पुणे, खंडाळा, पुष्कर या ठिकाणी रेव्ह पार्टीज मोठ्या प्रमाणावर चालतात. चरस, गांजा, हशीश, LSD, MDMA, Snake Bite असे अनेक हायप्रोफाईल ड्रग्ज या पार्ट्यांमध्ये उपलब्ध केले जातात. हायप्रोफाईल पार्टी असल्याने सगळा तामझामही उंची स्वरूपाचा असतो. उंची मद्य, उंची प्रकारात मोडणारे ड्रग्ज, उंची सिगरेट्स या सगळ्याचा समावेश अशा रेव्ह पार्ट्यांमध्ये असतो.
दिल्लीच्या आसपास ज्या रेव्ह पार्टीज चालतात त्यात खासरून इस्रायल, इराण, फ्रान्स या देशांमधले राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर जातात. तसंच मॉडेल्स, फॅशन क्षेत्रात काम करणारे लोक, सिनेजगतात काम करणारे लोक अशाही लोकांचा यामध्ये भरणा असतो. राजकारण्यांची मुलंही अनेकदा रेव्ह पार्टीजना जातात असं दिसून आलं आहे. एका रेव्ह पार्टीमधून राहुल महाजन, फरदीन खान अशा लोकांना अटक करण्यात आली होती. तसंच मुंबईत छापा मारण्यात आलेल्या एका पार्टीत शक्ती कपूरचा मुलगाही सहभागी होता. दिल्ली आणि आसपासच्या भागात होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये धनिकांची आणि बड्या उद्योजकांची मुलं सहभागी होतात.
NCB च्या चौकशीत मोठा खुलासा, आर्यन खान 4 वर्षांपासून करत होता ड्रग्सचं सेवन
रेव्ह पार्टीजची फी किती असते?
या रेव्ह पार्टीजमध्ये सहभाग घेण्यासाठीचं शुल्क हे 20 हजारांपासून सुरू होतं. 20 हजारांपासून 1 लाखांपर्यंत हे शुल्क असतं. या पार्टीमध्ये काय काय ‘सोय’ केली आहे त्यावर त्याची फी ठरते. या पार्टीजमध्ये एका अत्यंत बदनाम ड्रगचाही वापर होतो. त्या ड्रगचं नाव आहे रेप ड्रग. या ड्रगला कुठलाही वास, स्वाद किंवा रंग नसतो. एखाद्या मुलीला हे ड्रग सेवन करायला दिलं तर त्यानंतर तिच्यावर बलात्कारही केला जाऊ शकतो. अशी माहिती एका पोलीस चौकशी दरम्यान एका डिजेने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली होती.
रेव्ह पार्टीज आधी निर्जन ठिकाणी, खुल्या भागात होत असत. त्यासाठी जंगल, टेकडी, एखाद्या शेतात दूर एकाजागी असे भाग हेरले जात असत. मात्र या भागांवर नजर ठेवली जाऊ लागल्याने आणि पोलिसांची पाळत असल्याने आता बंदीस्त स्वरूपात ही रेव्ह पार्टी केली जाते. तसंच अनेक पार्टीजमध्ये रेव्ह हट ही तयार केल्या जातात. जर पार्टीमध्ये धुंद झाल्यानंतर कुणाला सेक्स करण्याची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी केलेली ही सोय असते असंही एका डीजेने सांगितलं होतं.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अशाच रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाली आहे. त्याच्या चौकशीत हे देखील समोर आलं आहे की तो चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन आजचं नाही बरंच जुनं आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज अभिनेत्रींची या प्रकरणी चौकशी झाली होती. अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांसारख्या सेलिब्रिटीजना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.
चमचमत्या ताऱ्यांची दुनिया म्हणून बॉलिवूड ओळखलं जातं. पण या चमचमत्या ताऱ्यांना रेव्ह पार्टी, अंमली पदार्थ सेवन, व्यसनाधिनता अशा काळ्या बाजूही आहेत हे विसरून चालणार नाही.
ADVERTISEMENT