महाराष्ट्रात २१ जूनला शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी बंड केलं. या बंडाला चार महिने उलटून गेले आहेत. या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. तसंच त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. अशात आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या सत्तानाट्यावर भाष्य करत एकनाथ शिंदेंच्याबाबत एक चूक महागात पडली असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?
”दीड वर्षापासून ठाकरे कुटुंबाला शिंदे काहीतरी करण्याच्या विचारात असल्याची चाहूल लागली होती. शिंदेंच्या जवळचे लोक असतील किंवा इतर माध्यमातून असेल ठाकरे कुटुंबाच्या कानावर ही कुणकुण आली होती. या दीड वर्षाच्या कालावधीत अनेकांनी आम्हाला इशारा दिला होता.
आम्ही डोळे बंद करून एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला
मात्र आम्ही एकनाथ शिंदेंवर डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि तीच चूक आम्हाला महागात पडली” असं आता आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मटा कॅफेमध्ये येऊन विविध प्रश्नांना उत्तरं दिली. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांचं बंड होणार याची कुणकुण लागली होती असं म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंबाबत?
एकनाथ शिंदे यांच्या जवळचे काही लोक, पीए वगैरे जेलमध्ये होते हे जगजाहीर आहे. पण विश्वास आपल्या माणसांवर ठेवायचा असतो की जे येऊन सांगतात त्यांच्यावर? एकनाथ शिंदे हा माणूस फुटू शकतो, आमच्याबरोबर येऊ शकतो असं सांगणाऱ्यावर आम्ही विश्वास ठेवला नाही. कदाचित यात आमची चूक झाली. शिंदे फुटू शकतात हे सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी आम्ही शिंदेंवर विश्वास ठेवला तीच मोठी चूक झाली.
एकनाथ शिंदे यांना काय दिलं नाही?
मागच्या १५ ते २० वर्षात एकनाथ शिंदे यांना पक्षाने काय दिलं नाही? एवढंच काय आमचा पूर्ण विश्वासही त्यांच्यावर होता. २० मे २०२२ ला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. उद्धवसाहेबांनी त्यांना हे पण विचारलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? ही घ्या चावी आणि मुख्यमंत्री व्हा. मला जबाबदारी दिली आहे ती स्वीकारली आहे. लोकांची सेवा करतो आहे, पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर व्हा असं उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना सांगितलं होतं. तेव्हा ते रडले वगैरे. तुम्हीच मुख्यमंत्री, तुम्हीच आमच्यासाठी देव वगैरे वगैरे ड्रामही केला आणि त्यानंतर स्वतःच फुटले असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT