वाघासारखा माणूस! बाळासाहेबांना आठवताना…: नितीन गडकरी

मुंबई तक

• 02:01 AM • 23 Jan 2022

नितीन गडकरी आजवर अनेक महापुरुषांचं मार्गदर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या दिग्गजांपैकीच एक होय. बाळसाहेब ठाकरे यांनी माझ्या मनावर व्यक्तिमत्वावर आणि सार्वजनिक जीवनावर मोठा प्रभाव टाकण्याचं काम केलं. मी जेव्हा भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा मला स्वतःच्या मातीची गर्जना करणारा वाघच त्यांच्या रूपाने दिसतो. बाळासाहेब ठाकरे मला स्वर्गातूनही आशीर्वाद देत असतील […]

Mumbaitak
follow google news

नितीन गडकरी

हे वाचलं का?

आजवर अनेक महापुरुषांचं मार्गदर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या दिग्गजांपैकीच एक होय. बाळसाहेब ठाकरे यांनी माझ्या मनावर व्यक्तिमत्वावर आणि सार्वजनिक जीवनावर मोठा प्रभाव टाकण्याचं काम केलं. मी जेव्हा भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा मला स्वतःच्या मातीची गर्जना करणारा वाघच त्यांच्या रूपाने दिसतो. बाळासाहेब ठाकरे मला स्वर्गातूनही आशीर्वाद देत असतील याची मला खात्री आहे. बाळासाहेब हे दृढनिश्चयी, धाडसी, आक्रमक तरीही अत्यंत दयाळू अंतःकरणाचे होते. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू जवळून पाहिले आहेत.

मी त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आणि सार्वजनिक जीवनात मला त्या गोष्टी उपयुक्त ठरत आहेत. त्यांनी माझ्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. ते असे नेते होते जे एखादा प्रसंग आला तर धर्म, जात, पंथ, निष्ठा याच्याही पलिकडे जाऊन निर्णय घेऊ शकत होते. ती ताकद त्यांच्यामध्ये होती. मला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचा एक प्रसंग आठवतो. विदर्भातील एका मतदार संघात एका शिवसैनिकाची उमेदवारी निश्चित करण्यास म्हणजेच ती जागा त्याला देण्यात आम्ही थोडं नाखुष होतो कारण त्या भागातली जातीय समीकरणं त्याच्या बाजूने नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांनी गर्जना केली आणि म्हणाले की मी सार्वजनिक जीवनात जात, पात, पंथ याला कोणतंही महत्त्व देत नाही. ते अत्यंत कठोरपणे आणि तेवढ्याच स्पष्टपणे त्यांनी आम्हाला बजावलं. उमेदवार निश्चित झाला आणि त्याने निवडणूक जिंकली.

बाळासाहेब ठाकरे हे एक बंडखोर आणि वेगळ्या वाटेने जाणारे नेते होते. त्यांचं राजकीय व्यंगचित्रकार असणं ही बाब भारताच्या राजकारणासाठी अत्यंत पोषक आणि त्याला आकार देणारी ठरली. त्यांचा राजकीय प्रवास मुळीच सोपा नव्हता उलट आव्हानांनी भरलेला होता.

मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाला त्याचं स्थान आणि त्याचं महत्त्व मिळवून देण्याचं मोठं आव्हान त्यांनी पेललं. प्रत्येक आव्हानाला ते शूरपणे सामोरे गेले. जेव्हा त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली तेव्हा राजकीय शक्तींच्या विरोधात दोन हात करण्याचं सामर्थ्य आणि तयारीही त्यांनी दाखवली. माझ्या कानात कधी कधी बाळासाहेबांची वाक्य आजही घुमतात जेव्हा मी आव्हानांना सामोरा जात असतो तेव्हा. कोणतंही नवं आव्हान समोर आलं की मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, मुंबईतले 50 हून अधिक उड्डाण पूल आणि वांद्रे वरळी सी लिंकची कल्पना मी प्रत्यक्षात आणली तेव्हा बाळासाहेब मला गडकरी ऐवजी रोडकरी म्हणू लागले. माझ्या कामांबाबत ते नेहमीच माझं कौतुक करत असत. मला प्रोत्साहन देत असत.

राजकारण म्हटलं की तो स्वार्थाचा खेळ आहे असं मानलं जातं.. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या मनाच्या नेत्याला जेव्हा आपण भेटतो तेव्हा जाणवतं की अशी माणसं पक्षाच्या पलिकडे, सगळ्या गोष्टींच्या पलिकडे जाऊन विचार करतात. सार्वजनिक जीवनात त्यांनी मला जे प्रेम, आपुलकी दिली त्यासाठी मी त्यांचा कायमच ऋणी आहे. आज ते आपल्यात नाहीत मात्र त्यांनी दिलेले आशीर्वाद कायमच माझ्या पाठिशी राहतील असं मला मनोमन वाटतं.

मी संघाचा स्वयंसेवक म्हणून लहानाचा मोठा झालो. माझ्यावर तो संस्कार घडला. त्या काळात अ. भा. वि. प. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजयुमो मधल्या दिग्गजांचं मार्गदर्शन तर मला लाभलंच. पण त्याशिवाय अटलजी आणि बाळासाहेब ठाकरे यांना मी आदर्शवत मानतो. त्यांचं भाषण प्रखर आणि त्यांची भाषा आक्रमक होती. मला त्यांचा दीर्घ सहवास लाभला हे मी माझं भाग्यच समजतो.

राज ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यावर चित्रचरित्र करायचं ठरवलं तेव्हाचा प्रसंग आठवतो. जुन्या आणि काही नव्या फोटोंचा संग्रह त्यामध्ये आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंकडे आग्रह धरला की उड्डाण पुलाजवळ गडकरींना बोलव. मला बोलवल्याप्रमाणे मी उड्डाण पुलाजवळ गेलो तिथे आम्ही फोटोसाठी पोझ दिली. माझ्या मनात ती आठवण आजही कायम आहे. माझ्या मनावर जणू ती कोरली गेली आहे असंच म्हटलं तरीही चालणार आहे. एक सच्चे जननेते म्हणून बाळासाहेब ठाकरे माझ्या स्मरणात कायम राहतील. एक दिग्गज नेते आणि माझे मार्गदर्शक बाळासाहेब यांना विनम्र आदरांजली अर्पण.

(हा लेख India Today च्या अंकात प्रकाशित झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सदर लेखाचं भाषांतर आम्ही मुंबई तकच्या मराठी वाचकांसाठी केले आहे. )

    follow whatsapp