ठाणे: ठाण्याचे (Thane) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयावर 24 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने छापे टाकले होते. तेव्हापासून जवळजवळ अज्ञातवासात गेले होते. पण काल (21 जून) त्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
ठाण्यातील बडं प्रस्थ असणाऱ्या प्रताप सरनाईक हे खरं तर अगदी सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत आमदारपदापर्यंत पोहचले आहेत. त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. रिक्षा चालक ते 125 कोटींचा मालक हा नेमका प्रवास कसा होता हे आता आपण जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून.
प्रताप सरनाईक हे मूळचे वर्धातील. मात्र, लहानपणीच ते डोंबिवलीत स्थायिक झाले. इथेच त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण देखील पूर्ण शिक्षण झालं. प्रताप सरनाईक यांचं मूळ आडनाव गांडुळे हे होतं. पण नंतर त्यांनी ते बदलून सरनाईक असं करुन घेतलं.
सुरुवातीच्या काळात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी डोंबिवलीत अंडा भुर्जीची गाडी देखील लावली होती. तर काही काळ ते रिक्षा देखील चालवत होते असं सांगितलं जातं. अंडा भुर्जी विकणारा, रिक्षा चालविणारा मुलगा हा दरम्यानच्या काळात व्यावसायिक म्हणून नाव कमवू लागला होता.
ठाण्यात बांधकाम व्यवसायिक म्हणून सरनाईक यांनी नावलौकिक कमावला. ठाण्यात त्यांनी आतापर्यंत अनेक मोठमोठी गृहसंकुलं उभारली. त्यामुळे व्यवसायिक म्हणून त्यांनी आपला जम चांगला बसवला. याच काळात त्यांनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला.
आपल्या सक्रीय राजकारणाची सुरवात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. ते ठाण्यातील लोकमान्य नगरमधून ते तीन वेळा नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून गेले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांची मैत्री बरीच प्रसिद्ध होती. आव्हाडांचे मित्र अशीच त्यांची ओळख होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोन्याने मढवलेला मोबाइल गिफ्ट देण्याच्या प्रकरणावरुन प्रताप सरनाईक हे खूपच चर्चेत आले होते. त्यावेळी अजित पवारांनी सोन्याचा मोबाइल घेणं नाकारलं होतं. मात्र, या सगळ्यामुळे प्रताप सरनाईक यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
Pratap Sarnaik: ‘सरनाईकांचं ‘ते’ पत्र म्हणजे भाजपकडून सरकार अस्थिर करण्याची खेळी आहे’
2008 साली त्यांनी तेव्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 20 लाख रुपये किंमतीचा हिरे जडीत मोबाइल गिफ्ट दिला होता. सिद्धीविनायक गणपतीच्या लिलावात हा मोबाइल त्यांनी 20 लाख रुपयांना विकत घेतला होता. नंतर त्यांनी तो अजित पवारांना भेट दिला होता. त्यांनी दिलेली ही महागडी भेटवस्तू प्रकरण त्यावेळी खूपच गाजलं होतं.
खरं तर त्यावेळी पहिल्यांदाच अवघ्या महाराष्ट्राचं प्रताप सरनाईक यांच्याकडे लक्ष गेलं.
दरम्यान, 2009 साली राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. याच वर्षी ओवळा-माजीवडा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्या वर्षीच्या निवडणुकीत मनसेची प्रचंड हवा होती. मात्र तरीही प्रताप सरनाईक यांनी आमदार म्हणून तिथं विजय मिळवला. त्यामुळे इथूनच त्यांचा शिवसेनेसोबतचा प्रवास सुरु झाला.
नंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी देखील त्यांची ओळख निर्माण झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा शिवसेना आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. तो खर्च इतर काही आमदारांबरोबर प्रताप सरनाईक यांनीही केला होता असं बोललं जातं. आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेने तो खर्च त्यांनी केला असल्याची त्यावेळी जोरदार चर्चा होती.
Sanjay Raut: ‘काय कराल, तुरुंगात टाकाल ना…,’ सरनाईकांच्या पत्रानंतर राऊतांनी भाजपला दिलं आव्हान
दरम्यान, 2019 च्या निवडणूक अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात असं नमूद केलं होतं की, त्यावेळची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही 125 कोटींच्या घरात होती. म्हणजेच एक सामान्य रिक्षाचालक ठाण्यातील एक बडं प्रस्थ बनला होता.
सध्याच्या घडीला प्रताप सरनाईक विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ठाण्यातील अनेक रियल इस्टेट प्रकल्पांमध्ये विहंग ग्रुप सहभागी आहे. ठाण्यातील विहंग इन हे थ्री स्टार हॉटेल देखील त्यांच्याच मालकीचं आहे. रियल इस्टेट व्यवसायात देखील विहंग ग्रुपचा मोठा दबदबा आहे. याशिवाय कान्हा, हृदयांतर या चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली आहे.
Exclusive: CM ठाकरेंना दिलेल्या पत्राआधी सरनाईकांनी केलेलं मोठं वक्तव्य
प्रताप सरनाईक यांची दोन्ही मुलं विहंग आणि पूर्वेश हे दोघेही युवासेनेचे पदाधिकारी आहेत. ही दोन्ही मुलं आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं. (rickshaw driver to owner of rs 125 crore who is mla pratap saranaik)
ADVERTISEMENT