नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुपचूप आपलं लग्न उरकलं आहे. तेजस्वी यादव यांनी एअर होस्टेस असलेल्या अॅलेक्सिस हिच्याशी लग्न केले आहे. तेजस्वी आणि अॅलेक्सिस एकमेकांना 6 वर्षांपासून ओळखतात आणि जुने मित्र आहेत.
ADVERTISEMENT
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यांना साखरपुड्यानंतर दोन महिन्यांनी लग्न करायचं होतं. पण साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपलं लग्न आटोपलं.
तेजस्वी यांचा साखरपुडा आणि लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम दिल्लीतील सैनिक फार्ममध्ये पार पडला. हे सैनिक फार्म त्यांची बहीण मीसा भारती यांचे आहे. सैनिक फार्मच्या बाहेर आणि आत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जात आहे. प्रत्येक गेटवर वाहनाचा तपशील नोंदवला जात आहे. यासोबतच अनेक बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत.
ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. असे सांगितले जात आहे की, आत प्रवेश करण्यासाठी, तीन-स्तरीय सुरक्षा तपासणीतून प्रत्येकाला जावे लागत आहे. मीडियातील कोणत्याही व्यक्तीने कार्यक्रमस्थळी फिरकू नये, अशा कडक सूचना बाऊन्सर्संना देण्यात आल्या आहेत.
तेजस्वी यादव यांचं लग्न ठिकाण गुलाबी आणि निळ्या रंगाच्या थीमने सजवण्यात आले आहे. गेटचा प्रवेश पांढरा आणि गुलाबी फुलांनी सजवला आहे. आतमध्ये एक भव्य स्टेज बांधला आहे. ज्यामध्ये फुलांवर आधारित सजावट आहे. खाण्याबाबत बोलायचे झाले तर खाण्यासाठी शाही खाद्यपदार्थही ठेवण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांमध्ये अनेक मिष्टान्न ठेवण्यात आले आहेत.
कोण आहे तेजस्वी यांची पत्नी?
तेजस्वी यांची पत्नी अलेक्सिस ही यापूर्वी एअरहोस्टेस होती. ती वसंत विहार, दिल्ली येथे राहते आणि तिचे वडील चंदीगडमधील एका शाळेचे मुख्याध्यापक होते. सूत्रांच्या मते, अॅलेक्सिस आणि तेजस्वी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना भेटायचे. तब्बल 6 वर्षापासून ते एकमेकांना ओळखत आहेत.
सूत्रांच्या मते, तेजस्वी यांच्या या निर्णयावर त्यांचे वडील लालू प्रसाद यादव हे अजिबात खूश नव्हते. या प्रकरणी ते आपल्या मुलावर प्रचंड नाराज झाले होते. अॅलेक्सिस ख्रिश्चन कुटुंबातील असल्याने लालू प्रसाद यादव यांचा या लग्नाला आक्षेप होता. पण अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर लालू आणि कुटुंबीयांना तेजस्वी यांच्या आग्रहापुढे नमते घ्यावे लागले आणि त्यांचं लग्न पार पडलं.
ADVERTISEMENT