अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने जमीनीच्या खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. या आरोपानंतर राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. राम मंदीराच्या आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या शिवसेनेनेही या विषयावरुन आपलं मत नोंदवलं असून या प्रकारामुळे हिंदूच्या श्रद्धेला ठेच पोहचल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
“खासदार संजय सिंह यांनी सादर केलेले पुरावे धक्कादायक आहेत. अयोध्या हा विषय इतरांसाठी राजकारणाचा असला तरीही आमच्यासाठी तो विषय श्रद्धेचा आणि आस्थेचा आहे. सामान्य लोकांच्या घरातून निधी जमा केला गेला आहे. या निधीचा जर गैरवापर होत असेल तर श्रद्धेला अर्थ राहणार नाही. या प्रकरणामुळे हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहचली आहे. सरसंघचालक मोहन भागवत, विहींपच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं.” पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊतांनी शिवसेनेची बाजू मांडली.
संजय सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे, दोन इस्टेट डिलर्सनी १८ मार्चला १.२०८ हेक्टर जमिन २ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. ही जमिन खरेदी केल्यानंतर अवघ्या १० मिनीटांमध्ये ही जमिन राम मंदीर ट्रस्टला विकण्यात आली ज्याची किंमत १८.५ कोटी एवढी आहे. एखाद्या जमिनीची किंमत अवघ्या ५ मिनिटांमध्ये २ कोटीवरुन १८ कोटी कशी काय वाढली? असा सवाल पांडे यांनी विचारला आहे. २ कोटींच्या खरेदीमध्ये आणि १८ कोटीच्या व्यवहारात राम मंदीर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा साक्षीदार असल्याची माहितीही सिंह यांनी दिली. हा Money Laundering चा प्रकार असून सीबीआय किंवा ईडीने याची चौकशी करणं गरजेचं असल्याचंही सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हणलं.
दोन कोटी रपयांमध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा भाव सेकंदाला साडेपाच लाख रुपयाने वाढत गेलाय. भारतच काय जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जमिनीचे भाव इतक्या जोरात वाढत नाहीत. हा उघडपणे भ्रष्टाचार आहे. देशातील कोट्यवधी राम भक्तांनी आपल्या कष्टाने कमावलेले पैसे या मंदीराच्या वर्गणीसाठी दिले आहेत, हा त्यांच्या भावनांचा अपमान आहे. कोणत्याही ट्रस्टमध्ये जमिन खरेदीसाठी एक ठराव केला जातो. पण इथे केवळ ५ मिनीटांत हा प्रस्ताव राम मंदीर ट्रस्टने पारित केला आणि जमिनीची खरेदीही केली. राम मंदीराच्या नावाखाली स्थापन झालेल्या ट्रस्टमध्ये लोकं कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचंही संजय सिंह म्हणाले.
दरम्यान राम मंदीर ट्रस्टने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सावध प्रतिक्रीया दिली आहे. “अशा प्रकारच्या आरोपांना आम्ही घाबरत नाही, आम्ही या आरोपांचा अभ्यास करु. यानंतर योग्य ती चौकशी केली जाईल. आमच्यावर महात्मा गांधींची हत्या करण्याचाही आरोप झाला होता, त्यामुळे आम्हाला अशा आरोपांची भीती वाटत नाही”, अशा प्रतिक्रीया चंपत राय यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT