मुंबईत शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासोबतच आज सावरगांव येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. यापूर्वी सकाळी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही दसरा मेळावा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संतोष यादव या उपस्थित होत्या.
ADVERTISEMENT
दरम्यान, संघाच्या दसरा मेळाव्याला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या गणवेशात उपस्थित होते. सोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी देखील संघाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.
यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, पुरुष श्रेष्ठ की महिला हा वाद आम्ही करत नाही. महिलांना घरात ठेवणं योग्य नाही. समाजात दोघांचेही काम परस्परपुरक आहे. सोबतच त्यांनी जगात आपल्या भारताचं स्थान वाढले असल्याचेही अधोरेखित केले. ते म्हणाले, जगात भारताचे वजन वाढत आहे. अर्थव्यवस्था, क्रीडा क्षेत्रात भारत लक्षणीय कामगिरी करत. भारत आत्मनिर्भर होत आहे.
इंग्रजी भाषला महत्व नको :
मोहन भागवत यांनी इंग्रजीला जास्त महत्व न देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, आमची मुले मातृभाषा बोलत नाही, अशी लोकांची तक्रार असते. मात्र लोक आपल्या मुलांना मातृभाषा शिकण्यासाठी पाठवतात का? याचा विचार होणं गरजेचं आहे. आता नवीन शिक्षण धोरणात त्यावर भर देण्यात आला आहे. करिअरसाठी इंग्रजी आवश्यक नाही.
विविध क्षेत्रांतील ८० टक्के यशस्वी लोक दहावीपर्यंत मातृभाषेतच शिकले आहेत. जर नवे शैक्षणिक धोरण यशस्वी करायचे असेल तर मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवे. स्वाक्षरी, नामफलक, निमंत्रणपत्रिका मातृभाषेत असायला हव्यात असा सल्लाही त्यांनी दिला.
सरसंघचालकांनी देशाच्या लोकसंख्येवरदेखील यावेळी भाष्य केले. लोकसंख्या ही समस्या आहे, मात्र या समस्येचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या लोकसंख्येचा योग्य उपयोग केल्यास देशाला फायदा होऊ शकतो, असे सरसंघचालक म्हणाले.
ADVERTISEMENT