रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. संघर्षाचा १९वा दिवस असून, रशियाच्या विध्वंसक हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांना युक्रेनकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र, या लष्करी संघर्षात प्रचंड जीवितहानी होत आहे. आतापर्यंत युक्रेनमध्ये ५९६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
२४ फेब्रवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं होतं. त्यानंतर युक्रेनची राजधानी कीव्हचा पाडाव करून सत्तांतर करण्याचा प्रयत्न रशियाचा आहे, पण अद्यापही कीव्ह रशियाच्या ताब्यात आलेलं नाही. त्यामुळे संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे.
दरम्यान, रशियन लष्कराकडून नागरी वसातहतींबरोबरच रुग्णालयांवरही हल्ले करण्यात आल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. युक्रेनचे आरोग्यमंत्री विक्टर ल्याश्को यांनी सांगितलं की, रशियन सैनिकांनी आतापर्यंत ७ रुग्णालये पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. त्याचबरोबर इतर १०४ रुग्णालयांनाही लक्ष्य केलं गेलं. रशियाच्या हल्ल्यात ६ आरोग्य कर्मचारी मारले गेले असून, १२ जण जखमी झाले आहेत, असंही ते म्हणाले.
युक्रेनमध्ये ५९६ नागरिकांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत ५९६ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने ही माहिती दिली आहे. या युद्धात आतापर्यंत ५९६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १,०६७ नागरिक जखमी झाले आहेत, असं यूनोच्या मानवाधिकार कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
युक्रेनचा आंतरराष्ट्रीय व्यापार रोखला
युक्रेनवर आक्रमक केल्यानंतर रशियाचे हल्ले सुरूच असून, आता रशियाकडून आणखी एक प्रहार करण्यात आला आहे. रशियाने काळा समुद्र मार्गे होणारा युक्रेनचा व्यापार रोखला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रशियाने काळ्या समुद्रातील बंदरावरून होणारा युक्रेनचा व्यापार रोखला आहे. यामुळे युक्रेनचं मोठा फटका बसणार आहे.
दोन्ही देशातील संघर्षादरम्यान, युक्रेनने रशियाची लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. १३ मार्च रोजी रशियन सैन्याची ४ लढाऊ विमानं आणि ३ हेलिकॉप्टर पाडली असल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. रशियाच्या लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरवर अँटी-टँक क्राफ्ट मिसाईलने हल्ला करण्यात आला होता.
युक्रेनमधील २४ भागांपैकी १९ भागांमध्ये हवाई हल्ल्यांचा अर्लट जारी करण्यात आला आहे. सध्या युक्रेनमधील खारकीव्ह शहरात अजूनही रशियाचे हल्ले सुरूच आहेत. रशियन सैन्याकडून शहरात हवाई हल्ले केले जात आहेत. दरम्यान, युक्रेन-रशिया संघर्षात एका परदेशी पत्रकाराचा मृत्यू झाला. युक्रेनच्या खासदार इन्ना सोव्हसुन यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT