Russia-Ukraine War : युक्रेनमधील दोन शहरांत तात्पुरता युद्धविराम! रशियाने केली घोषणा

मुंबई तक

• 08:29 AM • 05 Mar 2022

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केलं होतं. त्यानंतर रशियन सैन्याकडून सातत्याने युक्रेनमधील विविध शहरांवर हल्ले केले जात आहे. यामुळे लोक अडकून पडले असून, आज (५ मार्च) दोन शहरातील हल्ले तात्पुरते थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. युक्रेनमधील अस्तित्वात असलेल्या सरकारचा पाडाव करून नवीन सरकार स्थापित करण्यासाठी […]

Mumbaitak
follow google news

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केलं होतं. त्यानंतर रशियन सैन्याकडून सातत्याने युक्रेनमधील विविध शहरांवर हल्ले केले जात आहे. यामुळे लोक अडकून पडले असून, आज (५ मार्च) दोन शहरातील हल्ले तात्पुरते थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे.

हे वाचलं का?

युक्रेनमधील अस्तित्वात असलेल्या सरकारचा पाडाव करून नवीन सरकार स्थापित करण्यासाठी रशियाकडून युक्रेनवर आक्रमण करण्यात आलं आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनवर जोरदार हवाई हल्ले केले जात असून, गेल्या दहा दिवसांपासून या हल्यांची तीव्रता वाढत चालली आहे.

‘रशियन सैनिक महिलांवर बलात्कार करत आहेत’, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

दरम्यान, युद्धामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत असून, दोन शहरांत अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी रशियाकडू तूर्तास हल्ले थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

युक्रेनमधील मारियूपोल आणि व्होल्नोवाखा या दोन शहरात हल्ले थांबवण्यात आले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे रशियन सैन्य आज (५ मार्च) दोन्ही शहरांवरील हल्ले थांबवेल. जेणेकरून लोकांना बाहेर पडण्यासाठी व मदतीसाठी सुरक्षित मार्ग तयार करून देता येईल. मारियूपोल आणि व्होल्नोवाखा शहरातील नागरिक बाहेरही जाऊ शकतील.

रशियाने म्हटलं आहे की, भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी दुपारी १२.३० वाजता मारियूपोल आणि व्होल्नोवाखा शहरात मानवी मदतीसाठी कॉरीडॉर सुरू केला जाईल. या काळात लोक शहर सोडून जाऊ शकतात.

रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील अनेक शहरांची अवस्था बिकट झाली आहे. युक्रेनमधील बुहतांश भागांमध्ये विनाशकारी मानवी संकटाची भीती व्यक्त केली जात असतानाच दोन शहरांत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

उद्ध्वस्त युक्रेन! लाखो लोक बेघरं; कीव्ह, खार्किव्हमध्ये प्रचंड विध्वंस, १० दिवसांत काय घडलं?

रशियाच्या हल्ल्यात कीव्ह, खार्किव्ह, सुमी, मारियूपोल ही शहरं सर्वात जास्त उद्ध्वस्त झाली आहेत.

मारियूपोल हे शहर युक्रेनच्या दक्षिणपूर्व दिशेला आहे. या शहराची लोकसंख्या साडेचार लाख इतकी आहे. मारियूपोल युक्रेनमधील सर्वात मोठं बंदर असून, रणनीतिच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. रशियन सैन्याने गुरुवारी शहराला वेढा देत हल्ले सुरू केले होते.

व्होल्नोवाखा हे छोटं शहर आहे आणि मारियूपोल शहराच्या उत्तरेला आहे. रशियाकडून आक्रमण झाल्यानंतर व्होल्नोवाखातील संघर्ष तीव्र झाला होता. डोनेत्स्क आणि मारियूपोल शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर व्होल्नोवाखा असल्यानं रशियासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातंय.

    follow whatsapp