भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं सुरू होतं. या कार्यक्रमात टायगर श्रॉफची एंट्री झाल्यानंतर राहुल देशपांडे यांना गाणं थांबवण्यास सांगितलं. पाच मिनिटं गाणं थांबवा आम्हाला टायगरचा सत्कार करायचा आहे. त्याववर राहुल देशपांडे यांनी असं म्हटलं की मी जर ब्रेक घेतला तर मी गाणं म्हणणार नाही. मला २० मिनिटं गाऊ द्या त्यानंतर तुम्ही तुमचा सत्कार करा. मात्र तसं घडलं नाही. यावरूनच सचिन आहिर यांनी आता आरोप केला आहे भाजपने मराठी कलाकारांचा अपमान केला आहे.
ADVERTISEMENT
सचिन अहिर यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे?
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!!भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा……..असं ट्विट करत एक व्हीडिओ ट्विट केला आहे. भाजपने जो दीपोत्सव मुंबईतल्या वरळीत आयोजित केला आहे त्या कार्यक्रमातला व्हीडिओही सचिन अहिर यांनी ट्विट केला आहे.
सचिन अहिर यांनी ट्विट केलेला व्हीडिओ नेमका काय आहे?
शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचं गाणं सुरू असतानाच टायगर श्रॉफची एंट्री होते. त्यावेळी भाजपचे आमदार मिहिर कुटेचा यांनी राहुल देशपांडे यांना टायगर श्रॉफच्या सत्कारासाठी गाणं थांबवायला सांगितलं. त्यावेळी राहुल देशपांडे म्हणाले की मी आत्ता ब्रेक घेतला तर मी पुढे गाणार नाही त्यापेक्षा मला सलग २० मिनिटं गाऊ द्या. त्यानंतर तुम्ही तुमचा सत्काराचा कार्यक्रम करा. यानंतर टायगर श्रॉफचा सत्कार एका कोपऱ्यात केला गेला. यावरूनच सचिन अहिर यांनी आक्रमक होत भाजपने मराठी कलाकारांचा अपमान केला आहे.
आशिष शेलार यांनी काय म्हटलं आहे?
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवावं. ते स्वतः कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन करत नाहीत. कार्यक्रमात कोणाचाही अपमान झालेला नाही. मराठी माणसांच्या मराठमोळ्या दीपोत्सवात बॉलिवूडमधले कलाकारही येत आहेत, मराठी माणसांसाठी हा अभिमानाचा विषय आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
भाजप मुंबईने नेमकं काय ट्विट केलं आहे?
एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचा सन्मान करत थांबतोय, तरीही घटनेचा विपर्यास करण्याचा करंटेपणा केला जात आहे. हे सत्ता गेल्याचं दुःख आहे, की पहिल्यांदा मु्ंबईत मराठी सण जोशात साजरे केले जाण्याची पोटदुखी ?
कार्यक्रमाची संपूर्ण क्लिप पाहिल्यावर काय लक्षात येतं?
पाच मिनिटांचा ब्रेक घेऊ असं जेव्हा जाहीर केलं जातं तेव्हा राहुल देशपांडे म्हणतात की आता मी ब्रेक घेतला तर मी पुढे गाणार नाही. मी २० मिनिटं गातो. त्यानंतर काय करायचं आहे ते करा. हे मला सांगण्यात आलं नव्हतं. जर आत्ता ब्रेक घ्यायचा असेल तर मी उठतो. त्यानंतर मिहिर कोटेचा तिथे आले ते म्हणाले फक्त सत्कार आहे. राहुल देशपांडे काही बोलताना दिसत नाही. अवघ्या काही सेकंदात टायगर श्रॉफचा सत्कार झाल्यावर तो खाली उतरतो. त्यानंतर राहुल देशपांडे पुन्हा गाणं सुरू करतात आणि ४५ मिनिटं गाणं गातात. हे कार्यक्रमाची सलग क्लिप पाहिल्यावर लक्षात येतं.
ADVERTISEMENT