मनसुख हिरेन हत्या आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणी NIA च्या कस्टडीत असलेल्या सचिन वाझेने ईडी चौकशीत महत्वाची माहिती दिली आहे. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणात ईडी सध्या अनिल देशमुखांची चौकशी करत आहे. कोर्टाच्या परवानगीने सचिन वाझेचा जबाब ईडीच्या अधिकाऱ्यांनी तळोजा कारागृहात नोंदवला. यावेळी सचिन वाझेने वसुलीचे पैसे बारमालकांकडून घेताना देशमुख यांचा उल्लेख No.1 असा करायचा अशी माहिती समोर येतेय.
ADVERTISEMENT
अनिल देशमुखांनी सचिन वाझेला मुंबईतील बार मालक आणि हॉटेल वाल्यांकडून १०० कोटी वसुल करायला सांगितले होते असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला होता. ईडीला दिलेल्या जबाबात सचिन वाझेने १०० कोटींच्या वसुलीप्रकरणात महत्वाची माहिती दिल्याचं कळतंय. बार मालकांकडून पैसे वसुल करताना सचिन वाझे हे पैसे नंबर १, क्राईम ब्रांच आणि सोशल सर्विस ब्रांचला जातात असं सांगायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे ज्या नंबर १ चा उल्लेख करायचा ते दुसरे तिसरे कोणी नसून अनिल देशमुखच होते. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची कस्टडी घेतानाही या नंबर १ चा उल्लेख करण्यात आला होता. सचिन वाझेच्या चौकशीनंतर No. 1 प्रकरणाचा उलगडा होण्याचे संकेत मिळत आहेत. ज्यामुळे ईडी चौकशीला जाणं टाळणाऱ्या अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची भीती आहे. दरम्यान ईडी या आठवड्यातही सचिन वाझेची चौकशी करणार आहे.
गेल्या महिन्यात ईडीने अनिल देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतील घरात छापेमारी केली होती. वसुली केलेल्या पैशांमधून काही रक्कम ही दिल्लीती बोगस कंपन्यांच्या माध्यमातून देशमुख यांच्या शिक्षण संस्थेला देण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे काम देशमुखांसाठी करायचे, ज्यामुळे ईडीने त्यांना अटक केली आहे. त्यातच सचिन वाझेने दिलेल्या जबाबानंतर आता ईडी देशमुखांविरुद्ध काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT