–विजयकुमार बाबर, सोलापूर
ADVERTISEMENT
सोलापूरमध्ये उन्हाच्या झळांबरोबर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर असा संघर्षही बघायला मिळत आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी आज थेट शरद पवारांवरच निशाणा साधला. यावेळी यशवंत जाधवांच्या ‘मातोश्री’बद्दलच्या नोंदीवरूनही त्यांनी खोचक टोला लगावला.
सदाभाऊ खोत बोलताना म्हणाले, “गोपीचंद पडळकर हे दुष्काळी पट्यातील एका शिक्षकाचे पुत्र आहेत. शेतात राबले आहेत. त्यांना आमदारकी मिळाली असेल आणि बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा वापर राष्ट्रवादी जर करत असेल, तर तुम्ही जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल तितकं ते उसळून वर येतील”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
“राजमाता अहिल्याबाई होळकर धनगर बांधवांचं, बहुजन समाजाचं दैवत आहेत. तुम्ही वर्षानुवर्षे धनगर समाजाला उपेक्षित ठेवलं. त्यांना कोणत्याही योजना दिल्या नाहीत. धनगर समाजातील तरुणांना उभं केलं नाही. त्यांना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवलं. निव्वळ भावनिकतेला हात घालून त्यांना गोंजरण्याचा प्रयत्न केला.”
“गोपीचंद पडळकर स्थानिक आमदार आहेत. त्यांना तुम्ही साधं निमंत्रणही देऊ शकत नाही. ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. विस्थापितांचं नेतृत्व गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहे. म्हणून मी त्यांच्या खांद्याला खांद लावून उभा आहे. त्यामुळे आम्ही पुतळ्यावर मेढपाळाच्या हस्ते पुष्पवृष्टी केली,” असं ते म्हणाले.
शरद पवारांवर सदाभाऊ खोत यांनी खोचक शब्दात निशाणा साधला. “शरद पवार महान नेते आहेत. त्यांनी या राज्यात काड्या करण्यापलीकडे काही केलेलं नाही. जाईल तिथं आग लावायची. परत दुसऱ्या घराला आग लावण्यासाठी निघून जायचं. त्यांचं आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं. म्हणून मला असं वाटतंय की त्यांचं आडनाव पवारांऐवजी आगलावे करावं. जेणेकरून जेवढं हे राज्य होरपळून निघालं आहे, ते आता थांबलं पाहिजे”, अशी टीका त्यांनी केली.
डायरीतील ‘मातोश्री’च्या नोंदी…
“प्रत्येकाला आपली मातोश्री प्रिय असते. श्रद्धेचं स्थान असतं. आईसाठी आपण जे काही करतो, ते आपण कुठे लिहून ठेवत नाही. आई इतकं श्रेष्ठ दुसरं कुणी या जगात नाही. पंरतु अलिकडच्या नामकरण झालेल्या ज्या मातोश्री आहेत. त्यांचे उपकार कशा पद्धतीने फेडतोय हे डायरीमध्ये लिहिलं जातं. आम्ही आमच्या आईला जे करतो, त्याचा हिशोब ठेवत नाही. आई वसुली अधिकारी असत नाही. आई प्रेमाची सांगड आहे. पण जिथं वसुली होते, त्याच्या बाबतीत तेच होतं”, अशा शब्दात त्यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली.
पुन्हा आमदारकीच्या संधीबद्दल बोलताना ते म्हणाले, “मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. सामान्य माणसाबद्दल मी आयुष्यभर बोलत आलोय. जे मला मिळालं, ते राज्यातील शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे मिळालं. लढाई समाजातील असो की, रस्त्यावरची असो…जी जी संधी मिळेल, त्या-त्या संधीच्या माध्यमातून सामान्य माणसांचे प्रश्न मांडले. पुढे काय होईल मला माहिती नाही”, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT