छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर रंगरंगोटी करून आणि चादर पसरवून धार्मिक प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न खासदार संभाजीराजेंनी हाणून पाडला. रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती किल्ले प्रेमी आणि शिवप्रेमींनी छत्रपती संभाजीराजेंना दिली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुरातत्त्व विभागाला एक पत्र लिहिलं. तसंच असा प्रयत्न होतो आहे त्याबाबत योग्य कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी केली.
ADVERTISEMENT
यानंतर लगेचच पुरातत्त्व विभागाने कारवाई करून धार्मिक स्थळ उभारण्याचा प्रय़त्न हाणून पाडला. तसंच रायगडावरचं ते ठिकाण पूर्ववत केलं. या ठिकाणी आता सुरक्षा रक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
काय आहे संभाजीराजेंचं पत्र?
दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल पुरातत्व विभागास पत्र दिले….
महोदय,
किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिले आहे.
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे.
किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी मदार मोर्चा याठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा.
– संभाजी छत्रपती
काय आहे संभाजीराजेंची पोस्ट?
दुर्गराज रायगड वरील मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी व मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
काही दिवसांपूर्वी यासंदर्भातला एक व्हीडिओही फेसबुकवर पोस्ट करण्यात आला होता. तो व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. किल्ले रायगडचं पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित रहावं यासाठी मदार मोर्चा या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचं नवीन बांधकाम किंवा रचना करण्यास पायबंद घालावा अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी मान्य करून या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT