-रोहिदास हातांगळे, बीड
ADVERTISEMENT
‘या सरकारकडून पूजा चव्हाणला न्याय मिळण्याची अपेक्षा होती, पण यानीही मंत्रिमंडळात स्थान दिलंय. ही लाजिरवाणी बाब आहे’, असं म्हणत पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आधीच आक्षेप घेतला असून, त्यानंतर आता संजय राठोडांमुळे सरकार टीकेचं धनी ठरताना दिसत आहे.
तब्बल दीड महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळात गेल्या सरकारमध्ये गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या संजय राठोड यांचा समावेश करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा टीकेचे सूर उमटू लागले आहेत.
९ ऑगस्ट रोजी १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात संजय राठोड यांचाही समावेश आहे. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता पूजा चव्हाणची आजी शांताबाई राठोड यांनी सरकारला सुनावलं आहे.
संजय राठोडांना मंत्री केल्याबद्दल पूजा चव्हाणची आजी काय म्हणाली?
शांताबाई राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधताना टीका केली. “या पक्षाकडून खरोखरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, मंत्रिमंडळाचा शपथविधी पाहता आता असं वाटत नाही. पक्षानं त्यांना वाचवलं आणि मंत्रिमंडळात स्थान दिलं, हे दुर्दैवी आहे. ही लाज आणणारी गोष्ट आहे. हा निर्णय आमचा अपमान करणारा आहे”, असं शांताबाई राठोड म्हणाल्या.
संजय राठोडांचा ‘तो’ इशारा, चित्रा वाघ म्हणाल्या “कुणाच्या बापाला घाबरत नाही”
संजय राठोडांवर शांताबाई राठोड यांचे गंभीर आरोप
शांताबाई राठोड म्हणाल्या, “एका मुलीची अब्रू काढून, गर्भपात करुन तिचा खून केला जातो. संजय राठोड एवढं होऊनही पहिल्या रांगेमध्ये बसतात. आता या सरकारने त्यांची आरती करावी, पूजा करावी म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल. पूजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील”, असा इशारा शांताबाई राठोड यांनी दिला.
“महिलांना ५० टक्के आरक्षण असून, पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही. पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चिट देऊ शकतात, पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि अखेरपर्यंत गुन्हेगारच राहणार. तो खुनी आहे खुनीच राहणार”, अशा शब्दांत पूजा चव्हाणची आजी शांताबाई राठोड यांनी आपला संताप व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्री असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून गंभीर आरोप झाले होते. बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा लहू चव्हाण या तरुणीने गेल्यावर्षी (२०२१) पुण्यात इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.
या तरुणीच्या आत्महत्येनंतर काही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. त्याचबरोबर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणामुळे संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
‘आता शांत बसणार नाही,’ संजय राठोडांनी सोडलं मौन; चित्रा वाघ यांना दिला हा इशारा!
संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाल्यानं मंत्रिपद दिल्याचा शिंदेंचा दावा
दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे सरकारला प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. संजय राठोड यांना मंत्री केल्यानं टीका होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दीपक केसरकर यांनी संजय राठोडांची बाजू घेतलीये. पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिलीये. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याचं शिंदे आणि केसरकरांनी म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT