शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने शरीरसुखाची मागणी केल्याचे आणि लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. याबाबत संजय राठोड यांनी मीडियासमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांपासून मला अननोन नंबर वरून मेसेज येत आहेत. तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू, मुंबईत तुमच्या विरोधात ही तक्रार दाखल करू, ती तक्रार दाखल करू असं सांगितलं जात आहे. मात्र मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. समाजाच्या प्रगतीसाठी जे करता येईल ते मी करतच राहणार असं म्हणत संजय राठोड यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. आजच त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या आऱोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात विरोध आणि स्पर्धा न करता खोटे आरोप केले जात आहे. माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राजकारणात लोकांनी आपली रेष मोठी करायला हवी मात्र ते दुसऱ्याची रेष छोटी करतात त्यातून हे सगळे प्रकार घडतता. ब्रेकिंग न्यूजसाठी कोणतीही शहानिशा न करता बातम्याही दिल्या जात आहेत. अशा बातम्यांमुळे एखाद्याचं करिअर बरबाद होऊ शकतं. काल एका पत्राचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. माध्यमांनी ही जीवघेणी स्पर्धा करू नये. माझा राजकीय प्रवास संपवण्याचा हा प्रयत्न आहे असंही राठोड यांनी म्हटलं आहे.
मी एका संस्थेचा प्रतिनिधी होतो. शिवपुरी येथे या संस्थेच्या माध्यमातून आश्रम शाळा सुरू आहे. या शाळेतील तीन कर्मचारी सातत्याने गैरहरज राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. हे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्यानंतर संस्थेने मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पदे भरण्याची परवानगी घेऊन तात्पुरती पदे भरली. तशी जाहिरात दिली होती. एका शिक्षकाचं प्रकरण झालं. त्याने सहायक आयुक्तांकडे राजीनामा दिला. 13 एप्रिल 2017 मध्ये राजीनामा दिला. नंतर हे प्रकरण नव्हतं. पण नंतर त्या शिक्षकाचे नातेवाईक आले आणि नोकरीवर घेण्याची विनंती होते. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्हाला नोकरीवर घेऊ शकत नसल्याचं त्यांना मी सांगितलं. हवं तर कोर्टात जा असं त्यांना सांगितलं, असं ते म्हणाले.
मीही त्या संस्थेचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी शाळेतील एका शिक्षकाला काही मेसेज आले. त्याचं नावही संजय आहे. ते माझे सहकारी आहेत. माझ्या नावाने त्यांना चुकीचे मेसेज आले. त्यांनी पोलीसात तक्रार केली आहे. कालांतराने माझं एक प्रकरण झालं. त्याचा आधार घेऊन काही केल्यास नोकरी मिळेल असा सल्ला त्या लोकांना कुणी दिला असेल. त्यामुळे मलाही मेसेज येणं सुरू केलं. त्यामुळे मीही 28 जुलै 2021 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली, असं त्यांनी सांगितलं. माझ्यावर करण्यात आलेले आरोप नैराश्यातून, मानसिकतेतून करण्यात आले आहेत असंही संजय राठोड यांनी स्पष्ट केलं.
काय म्हटलं होतं चित्रा वाघ यांनी?
शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसंच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो असंही या तक्रारीत म्हटलं आहे
ADVERTISEMENT