Sanjay Raut Rokhthok On PM Modi’s parliament speech : “अदानी (Adani) यांच्या खिशात पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी संपूर्ण देश घातला. मोदी यांनी अदानी यांना देश विकला”, असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) थेट नरेंद्र मोदींवरच हल्ला चढवला. संजय राऊतांनी रोखठोकमध्ये (Rokhthok) राहुल गांधींचं संसेदतील भाषणाबद्दल कौतुक करताना मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गौतम अदानी यांच्या विस्तारत चाललेल्या उद्योगाबद्दलचा मुद्दा उपस्थित करत काही प्रश्न मोदींना विचारले होते. त्यावर मोदींनी बोलणं टाळलं. यावरुनच राऊतांनी मोदींना 2014 ची कवितेची आठवण करून देत आरसा दाखवला आहे.
‘ही कविता वाचण्याची वेळ आली’, संजय राऊतांनी रोखठोकमध्ये काय म्हटलंय?
रोखठोकमध्ये संजय राऊत म्हणतात, “अदानी यांच्या खिशात पंतप्रधान श्री. मोदी यांनी संपूर्ण देश घातला. मोदी यांनी अदानी यांना देश विकला, असे विरोधकांचे म्हणणे आहे. भाजप व अर्थमंत्री अदानी यांची वकिली करताना दिसतात हे आश्चर्य आहे. श्री. मोदी व त्यांचा पक्ष विरोधी पक्षात असताना काँग्रेस आणि गांधी परिवार देश विकत असल्याचा आरोप भाजप करीत होता व त्यात नरेंद्र मोदी आघाडीवर होते. त्या वेळी जाहीरसभांतून गांधी परिवार व काँग्रेसविरोधात तोफा डागताना मोदी एक कविता तालासुरात वाचत. ती कविता अशी-
वे लूट रहे है सपनों को
मै चैन से पैसे सो जाऊं
वो बेच रहे हैं भारत को
खामोश मैं पैसे हो जाऊं
हां मैंने कसम उठायी है,
मैं देश नही बिकने दूंगा
सौगंध मुझे इस मिट्टी की
मैं देश नहीं मिटने दूंगा।
– इति मोदी
आता हीच कविता पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारबाबत जाहीरपणे वाचण्याची वेळ आली आहे.”
संजय राऊतांनी राहुल गांधींच्या भाषणाचं कौतुक
“मंगळवार, 7-2-2023 रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केलं. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर त्यांच्यात निर्माण झालेल्या प्रगल्भतेचं दर्शन या भाषणात झालं. ‘मोदी-अदानी’ युतीनं देश कसा एककल्ली भांडवलशाहीकडं जात आहे हे गांधी यांनी मुद्देसूद मांडलं व कोणत्याही प्रकारचा खोटेपणा त्यांच्या संपूर्ण भाषणात नव्हता. राहुल गांधी हे अदानी विषयावर सरकारची पिसं काढतील याची कल्पना असल्यानं पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह एकही वरिष्ठ नेता व मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता”, असं म्हणत राऊतांनी राहुल गांधींचं कौतुक केलं.
संजय राऊत पुढे म्हणतात, “राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदी उत्तरं देतील असं वाटलं होतं, पण मोदी यांनी अदानी यांच्याबाबत अक्षरही काढलं नाही व काँग्रेसवर टीका करीत बसले. मोदी म्हणाले, ‘मला आनंद आहे. ईडीमुळे सर्व विरोधक एकत्र आले.’ मोदी यांनी एकप्रकारे ईडीच्या खोट्या कारवायांचं समर्थन केलं, पण मोदी एक गोष्ट विसरले. ती म्हणजे, 1975 साली इंदिरा गांधी यांनी मिसा कायद्याचा दुरुपयोग करून विरोधकांना तुरुंगात टाकले. त्या मिसामुळे सर्व विरोधक एकत्र आले व त्यामुळे इंदिरा गांधी तसेच काँग्रेसचा पराभव झाला.”
पीएम केअर्स फंडवरून मोदींवर गंभीर आरोप
पीएम केअर्स फंडावरून राऊतांनी मोदींवर टीका केलीये. “संपूर्ण देशाचा उद्योग व अर्थव्यवस्था अदानींच्या माध्यमांतून ताब्यात ठेवण्याचा विचार घृणास्पद आहे, राष्ट्रभक्ती या व्याख्येत न बसणारा आहे. मोदी यांची सत्ता राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या पायावर नाही, तर खोटेपणाच्या टेकूवर उभी आहे. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे पी. एम. केअर्स फंड.”
संजय राऊतांनी सरकारच्या उत्तरावर व्यक्त केलं आश्चर्य
“पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता, सरकारी चिन्ह, सरकारी प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून हजारो कोटी रुपये या फंडात जमा केले गेले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांतून पैसे कापून या पी. एम. केअर फंडात टाकण्यात आले. त्यासाठी इंटरनेटचे `gov.in’ हे सरकारी डोमेन मिळविले. हे सर्व प्रकरण काही बेडर लोकांनी सर्वोच्च न्यायालयात नेले. तेव्हा मोदी सरकारने सांगितले, ‘पी. एम. केअर्स फंड सरकारी नाही व त्यावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही!’ हा सर्वच प्रकार धक्कादायक आहे.”
“स्वतः मोदी यांनी पंतप्रधानपदाचा अधिकृत वापर करून हा फंड सरकारी असल्याचे भासवून निधी गोळा केला व त्याचा हिशेब दिला नाही. हा आर्थिक अपराध नाही काय? तिस्ता सेटलवाड व साकेत गोखले या दोन पत्रकार व स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्यांना अशाच गुन्ह्याखाली (Crowd funding) ईडीने अटक केली व तुरुंगात टाकले. गोखले हे फक्त 10 लाखांच्या अशा व्यवहारासाठी तिहार तुरुंगात आहेत. पी. एम. केअर फंडात जमा झालेल्या रकमा हा त्याच पद्धतीचा गुन्हा आहे”, असं राऊतांनी म्हटलं आहे.
“राष्ट्रापेक्षा पंतप्रधान मोठे नाहीत व पंतप्रधान म्हणजे हिंदुस्थान नाही. तेथे अदानीसारखे उद्योगपती म्हणजेच देश कसे होऊ शकतील? अदानी प्रकरणाची चौकशी होणार नाही व पी. एम. केअर्स फंडातील ‘मनी लाँडरिंग’ तपासण्याची हिंमत ईडी व सीबीआयमध्ये नाही. राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी-अदानी युतीवर व सरकारच्या खोटेपणावर सर्जिकल स्ट्राइक केला”, असं टीकास्त्र राऊतांनी डागलं.
देश बराच विकला गेलाय… -संजय राऊत
संजय राऊतांनी लेखात म्हटलंय की, “राहुल गांधींचे भाषण संपल्यावर अनेक भाजप खासदारांचे चेहरे समाधानी होते. त्यांच्या मनात आनंद उसळत होता, पण चेहऱ्यावर दाखवता येत नव्हता. 2024 साठी हे आशादायी चित्र आहे. भारत कोणाच्या खिशात जात आहे ते राहुल गांधी यांनी बेडरपणे संसदेत सांगून टाकले. मोदींनी त्यावर उत्तर देण्याचे टाळले. मोदी 2014 पूर्वी गांधी परिवारास उद्देशून म्हणाले होते, ‘मैं देश नहीं मिटने दूंगा.’ आज तेच गांधी मोदींकडे पाहून बोलत आहेत, ‘मैं देश नहीं बिकने दूंगा!’ पण आठ वर्षांत देश बराचसा विकला गेलाय!”, अशी टीका राऊतांनी केली आहे.
ADVERTISEMENT