– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील शिवराळ भाषेवरुन उद्धव ठाकरेंना सल्ला देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खुद्द संजय राऊत यांनीच टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, दिवसागणिक त्यांचा पक्ष झिजतो आहे त्याकडे लक्ष द्यावं असं राऊत म्हणाले, ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजपर्यंत जे केलं ते उघड पडलेलं आहे आणि कारवाई होईल. तसेच आपल्यावरच नाही तर कुटुंबातील लोकांवर देखील होईल, अशी भीती वाटल्यानंतर माणूस सैरभैर होतो. अशीच स्थिती आत्ता संजय राऊत यांची झाली आहे. त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहे.”
“मी मागील दोन दिवसांपासुन उद्धवजींना विनंती करीत आहे. त्यांना जरा आवरा. शिवसेना संपवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे, असं दिसत असून त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा बिघडत आहे”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
संजय राऊत सोमय्यांना म्हणाले XX; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला
संजय राऊतांचं प्रत्युत्तर –
चंद्रकांत पाटलांना आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही. मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे कुटुंबासोबत आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देऊ नये, त्यांनी दिवगाणिक झिजत जाणारा स्वतःचा पक्ष सांभाळावा.
महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा बदलली आहे असं मला मुळीच वाटत नाही. जे महाराष्ट्रद्रोही आहेत, मराठीद्वेष्टे आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेत बोलावं लागतं. आमचे संतही हेच सांगून गेलेत. अशा लोकांची आम्ही पुजा करायची का, मिरवणुक काढावी का? जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी फारचं सौम्य भाषा वापरली आहे.
ADVERTISEMENT