संजय राऊत तुरुंगात, रश्मी ठाकरेंनी घरी जाऊन घेतली कुटुंबीयांची भेट

मुंबई तक

• 01:58 PM • 29 Sep 2022

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीने पत्राचाळ घोटाळ्यात अटक केली आहे. अशात आज रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. आज रश्मी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन म्हणजेच ठाण्यात जाऊन टेंभी नाका या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं. यानंतर रश्मी ठाकरे […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीने पत्राचाळ घोटाळ्यात अटक केली आहे. अशात आज रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.

हे वाचलं का?

आज रश्मी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन म्हणजेच ठाण्यात जाऊन टेंभी नाका या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं. यानंतर रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ झाली आहे. संजय राऊत एकीकडे तुरुंगात असताना दुसरीकडे रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जुलैला संजय राऊत यांना त्यांच्या घरून अटक केली. १ हजार कोटींच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. मात्र आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला १९ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत दिले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा दसरा तुरुंगातच होणार आहे.

उद्धव ठाकरेही भेटले होते संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना

संजय राऊत यांना जेव्हा ईडीने अटक केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. एवढंच नाही तर संजय राऊत यांच्या कुटुंबाला भेटून त्यांनी दिलासा देण्याचाही प्रयत्न केला होता. संजय राऊत लढवय्ये आहेत असाही उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला होता.

गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत यांची रिकामी खुर्ची

शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा नुकताच मुंबईतल्या नेस्को मैदानात पार पडला. या मेळाव्यात संजय राऊत यांची रिकामी खुर्ची स्टेजवर ठेवण्यात आली होती. संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवली आहे कारण ते मिंधे गटात गेले नाहीत. तर ते लढत आहेत. संजय राऊत हे लढवय्या आहेत त्यामुळे त्यांची खुर्ची आज या ठिकाणी ठेवली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. तसंच मोडेन पण वाकणार नाही असा संजय राऊत यांचा बाणा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. आज उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

    follow whatsapp