Sanjay Raut । Raj Thackeray । eknath Shinde । uddhav Thackeray । Maharashtra Politics: गुढीपाडवा दिनी मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभेतील टीकेनंतर खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही. मी सकाळी वाचलं. त्यांच्या पक्षाला 18 वर्षे होऊन गेली आहेत, पक्ष वयात आलाय. त्यांच्या पक्षाचं काय चाललंय मला माहिती नाही. मी माझ्या पक्षाविषयी विचार करतो. 18 वर्षांनंतर सुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच बोलत आहेत.”
संजय राऊत असंही म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे इतके मोठे नेते आहेत की, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बोलताहेत, नारायण राणे इतक्या वर्षांनंतरही उद्धव ठाकरेंवर बोलताहेत. भाजप उद्धव ठाकरेंवर बोलतोय. स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर बोलताहेत. याचाच अर्थ सगळ्यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटत आहे. तुम्ही तुमच्या पक्षावर बोला”, असा चिमटा राऊतांनी ठाकरेंना काढला.
“उद्धवला ओबेरॉयमध्ये घेऊन गेलो अन् विचारलं”; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
विरोधकांना उद्धव ठाकरे यांची धास्ती -संजय राऊत
“महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आलेले आहेत. अनेक प्रश्न आहेत. कायदा सुव्यवस्था… अमृतपाल पंजाबातून महाराष्ट्रात घुसला आहे. राज्याला धोका निर्माण झालाय, पण तोफा फक्त उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर. त्याच्यामुळे विरोधकांना उद्धव ठाकरे यांची धास्ती किती आहे, हे स्पष्ट होतं”, अशी भूमिका संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या टीकेवर बोलताना मांडली.
संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं, ‘तुमचा पक्ष कुठेय पाहा’
राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “20 वर्ष झाली, विसरा तुम्ही. तुमचं काम करा. तुमचा पक्ष कुठेय पाहा, हे मी प्रत्येकाला सांगतोय. महाराष्ट्राचे, देशाचे प्रश्न पाहा. उद्धव ठाकरेंनी सभा घेतली की, लगेच यांचं वऱ्हाड पाठीमागे येतं सभा घ्यायला. त्यामुळे कोण काय बोलतो याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्हाला आमची ताकद माहिती आहे. लोकमताचा पाठिंबा आम्हाला आहे.”
राज ठाकरेंनी नाक-कान टोचण्याचे उद्योग करावेत -संजय राऊत
सभा आणि मुंबईतील सुशोभीकरणावरून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे कान टोचले. त्याबद्दल संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. राऊत म्हणाले, ठिक आहे, त्यांनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा. दुसरं काही काम कुणाला दिसत नसेल, तर नाक, कान टोचण्याचे उद्योग सुरू करावेत. काही हरकत नाही. प्रत्येक पक्ष आपापली भूमिका असते. कुणाला कागदावर धनुष्यबाण मिळाला म्हणून होत नाही, लोकांचा पाठिंबा असावा लागतो. भाजपने दिलेली भाषणे सर्व पक्ष वाचून दाखवत आहेत, त्याचा मुख्य गाभा उद्धव ठाकरे हेच आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT