मुंबईच्या सांताक्रूझ भागातील पोदार शाळेत आज सर्व पालकांची चिंता वाढवणारा एक प्रसंग घडला. या शाळेतील विद्यार्थी आज शाळा सुटल्यानंतर बसमधून घरी येण्यासाठी निघाले. परंतू दुपारी साडेबारा वाजता शाळेतून निघालेली बस नॉट रिचेबल झाल्यामुळे पालकांची काळजी वाढत गेली. मुलांच्या काळजीने अस्वस्थ झालेल्या पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली, असता त्यांना तिकडे उडवा उडवीची उत्तर मिळाल्यामुळे पालकांच्या संतापाचा कडेलोट झाला.
ADVERTISEMENT
अखेर काही वेळाने ही मुलं घरी परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला खरा परंतू या निमीत्ताने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न समोर आला आहे.
दुपारी साडेबारा वाजता निघालेली बस साडेचार वाजेपर्यंत कुठे होती याचा जाब पालकांनी शाळेत जाऊन प्रशासनाला विचारला. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान या घटनेबद्दल माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही जणांकडून बसमधील मुलांचं अपहरण झाल्याचे मेसेज व्हायरल करण्यात आले. परंतू मुंबई पोलिसांनी यात ताबडतोक लक्ष घालत ही अफवा असून कोणत्याची प्रकारचे चुकीची माहिती सोशल मीडियावरुन न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.
आज पोदार शाळेचा पहिला दिवस होता, आणि त्या बसचा ड्रायव्हरही नवीन होता. ड्रायव्हरने या मार्गाची रेकी केली नव्हती. त्यामुळेच ही बस उशिरा पोहोचली. मुलांना उशीर झाल्याने पालक चिंतेत होते आणि ते शाळेत पोहोचले. परंतू ही बस सुरक्षित आहे, त्यातील सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. शाळेच्या ड्रायव्हरला रस्ते माहिती नसल्याने दोन दिवस त्यांना त्याची माहिती देणार आहेत, या दोन दिवसात शाळेच्या बस बंद करण्यात येतील. ही घटना फक्त आणि फक्त ड्रायव्हरला रस्ते माहिती नसल्याने घडल्याचं मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्ट केलं.
सकाळी सहा वाजता शाळेत गेलेली मुलं वेळेत घरी न आल्यामुळे पालक चिंतेत होते. त्यातच चालकाचा फोन स्विच ऑफ लागत असल्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली. त्यामुळे पालकांच्या संतापाचा अनावर झाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT