मुंबई: ‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’ असं एक स्टिंग ऑपरेशनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलं. ज्यामध्ये राज्य सरकारला हादरवून टाकणारे असे प्रचंड Video सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये थेट सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपानंतर सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी मुंबई Tak सोबत बोलताना या सर्व आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
पाहा वकिल प्रविण चव्हाण नेमकं काय म्हणाले:
‘हे पाहा सरकार माझं नाहीए. मी सरकारमध्ये कधीही नाहीए. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा राजकारणी किंवा त्यांच्या जवळचा नाहीए. राजकारणामध्ये सुद्धा नाहीए. माझ्या पूर्ण कालावधीत साधा ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आमदार-खासदार या कोणत्याही निवडणुकांमध्ये मी नाहीए. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा माझा प्रश्नच येत नाही.’
‘हे सर्व टेम्परिंग आहे किंवा जो काही आवाज वैगरे आहे ते आज नाही तर उद्या बाहेर येणारच आहे ना. हे पाहा माझं म्हणणं असं आहे की, अजून व्हीडिओ पाहिलेला नाही. मी त्यातील ऑडिओ अद्याप ऐकलेले नाहीत. दुसरी बाब त्यात अशी आहे की, यातील जो काही आवाज वैगरे आहे ते पोलीस नाही तर फॉरेन्सिक डिपार्टमेंट तपासतं.’
‘फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे. तिथून सुद्धा करता येऊ शकतं. सीबीआयची चौकशी किंवा कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही. चौकशी कोणती करायची हे सरकार ठरवणार. आपण पूर्ण केसेसमध्ये जेव्हा काम करत असतो त्यावेळी आरोपींना जर जामीन मंजूर झाला नाही तर आरोपी म्हणतो की, या वकिलाला बाजूला काढलं तर आपल्याला जामीन मिळू शकतो. हा कदाचित त्यांचा गैरसमज असू शकतो.’
‘आपण जर सुरेश जैन घरकुल घोटाळा पाहिला त्यामधील आरोपींना देखील जामीन हा लवकर मिळालेला नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर संतोष आंबेकर या नागपूरच्या केसमधील त्यालाही अडीच तीन वर्षापासून त्यालाही जामीन मिळालेला नाही. सगळ्याच गंभीर केसेस आपण पाहिल्या तर त्यात आपल्याला लक्षात येतं.’
‘त्यामुळे साहजिक आरोपींना वाटेल की, हा वकिल बाजूला गेला तर आपल्याला बेल होईल किंवा आपण या केसेसमधून सुटू शकतो असंही होऊ शकतं ना.’ असं प्रविण चव्हाण यावेळी म्हणाले.
कथित स्टिंग ऑपरेशनमधील प्रचंड खळबळजनक Video, फडणवीसांच्या टार्गेटवर आता थेट शरद पवार?
नेमकं प्रकरण काय?
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या संबंधित प्रकरणात भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांना मदत केल्याचा आरोप फडणवीसांनी विधानसभेत केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ आणि पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. आपल्याकडे सव्वाशे तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग आहे. यातील काही व्हिडीओ सभागृहात दाखवले तर इभ्रत जाईल. या व्हिडीओच्या माध्यमातून २० ते २५ वेब सिरीज होतील असाही टोला फडणवीसांनी सभागृहात लगावला.
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर २०१८ सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील एका वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केला. या प्रकरणात मोक्का लावण्यात यावा अशी कागदपत्र तयार केली. ही सर्व कारवाई विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं ठिकाण आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत आहे”, असं सांगून सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप फडणवीस यांनी केले आहेत.
ADVERTISEMENT