कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्वाचं असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट जून महिन्यात केंद्र सरकारला कोविशिल्ड लसीचे १० लाख डोस देणार आहे. यासंदर्भातला पत्रव्यवहार झाल्याची माहिती समोर येते आहे.
ADVERTISEMENT
जून महिन्यातील १० लाख डोसव्यतिरीक्त जुलै महिन्यातही सिरम इन्स्टिट्युट १०-१२ लाख लसींचे डोस पुरवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे या लसींचे डोस मिळाल्यानंतर दिवसाला १ कोटी नागरिकांना लस दिली जाईल असं सरकारचं लक्ष्य आहे. ज्यामुळे मंदावलेल्या लसीकरण प्रक्रीयेला वेग मिळण्याची शक्यता आहे.
“देशातली लसीची मागणी पाहता आम्ही लसींचं उत्पादन वाढवलं आहे. आम्ही सांगू इच्छितो की जून महिन्यात १० कोटी कोविशिल्ड लसीचे डोस पुरवणार आहोत. देशातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, आमची संपूर्ण टीम सरकारसोबत खांद्याला खांदा लावून मैदानात उतरली आहे.” असं पत्र सिरम इन्स्टिट्यूटचे विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्राला दिलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यासाठी केंद्र सरकारतर्फे राज्यांना 4.03 कोटींहून अधिक लसींचे डोसेस मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त एकूण 3.90 कोटी डोसेस 2021 च्या मे महिन्यात राज्य आणि खाजगी रुग्णालयांच्या थेट खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळेच मे 2021 मध्ये राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी एकूण 7,94,05,200 डोस उपलब्ध झाले आहेत.
ADVERTISEMENT