जन आशीर्वाद यात्रा काढल्याने BJP विरोधात 7 FIR, कोव्हिड प्रोटोकॉल मोडल्याचा गुन्हा

मुस्तफा शेख

• 04:59 PM • 19 Aug 2021

जन आशीर्वाद यात्रा काढल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात सात FIR दाखल करण्यात आल्या आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहिम, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजचा संपूर्ण दिवस चर्चा रंगली होती ती नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची. सकाळी 10 वाजता नारायण राणे हे मुंबई विमान तळावर आले. त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन […]

Mumbaitak
follow google news

जन आशीर्वाद यात्रा काढल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात सात FIR दाखल करण्यात आल्या आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहिम, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजचा संपूर्ण दिवस चर्चा रंगली होती ती नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची. सकाळी 10 वाजता नारायण राणे हे मुंबई विमान तळावर आले. त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी दादर या ठिकाणी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकालाही अभिवादन केलं. आज साहेब असते तर माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला असता असंही वक्तव्य त्यांनी केलं. आजचा संपूर्ण दिवस नारायण राणे विरूद्ध शिवसेना असाच होता.

हे वाचलं का?

आज काय म्हणाले नारायण राणे?

मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं असा प्रश्न आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. सिंगापूर, बँकॉक यांन मागील 30 वर्षांमध्ये किती प्रगती केली आहे बघा. मुंबईची सत्ता शिवसेनेकडे 32 वर्षे आहे त्यांनी काय केलं हो? मुंबई सगळी बकाल करून टाकली. कोरोनाच्या औषधांमध्येही शिवसेनेने भ्रष्टाचार केला. नेपियन सी रोडवर तुम्हाला ज्वेलर्समध्ये गर्दी दिसते. दुसरीकडे लालबाग, परळ या भागातला कष्टकरी माणूस त्याला खायची भ्रांत आहे. ही परिस्थिती कुणी निर्माण केली? असाही प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

कोरोनाची साथ आल्यानंतर मुंबईत किती तरी लोकांचे मृत्यू झाले? शिवसेनेने औषधांमध्ये भ्रष्टाचार केला. शिवसेनेत आता माणसं राहिलीच नाहीत. जे झाडावर उड्या मारत आहेत तेवढंच राहिलं आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आली पाहिजे. नायगावमध्ये झालेल्या सभेत नारायण राणे यांनी हे भाष्य करत शिवसेनेवर टीका केली आहे.

माझ्याकडे जे खातं केंद्रात दिलं आहे त्याचा उपयोग करून मी महाराष्ट्रात उद्योग, व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. करून दाखवायची माझ्यामध्ये धमक आहे. लोकांना सुखी पाहणं, समाधानी पाहिलं की मलाही समाधान वाटतं. कोकणात किती विकास केला आहे बघा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला इथे साथ दिली पाहिजे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp