योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
नागपुरात शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त मोठी पोलीस सुरक्षा व्यवस्था, दोन दिवसापूर्वी शरद पवारांच्या मुंबईस्थित सिल्वर ओक या घरावरील हल्ल्यात नंतर नागपुरात शरद पवार यांच्या आगमनानिमित्त पोलिसांनी कडक सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला. नागपूर शरद पवार यांचे आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचे भव्य स्वागत केले. यावेळी नागपूर विमानतळावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थानात घोषणाबाजी केली.
कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारून शरद पवार अमरावती कडे रवाना झाले आहेत. नागपूर विमानतळाबाहेर शरद पवार यांच्या आगमनानिमित्त हार्दिक स्वागतचे मोठे बॅनर लागले आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत परंतू त्यांचा मोठा फोटो शरद पवार यांच्या स्वागत च्या बाजूला नागपूर विमानतळाबाहेर होर्डिंग मध्ये लावण्यात आला आहे.
शरद पवार आज एकदिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 1 वाजता शरद पवार यांचं अमरावतीत आगमन होईल. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर 4.15 वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातील आणि सायंकाळी 5 ते 7 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
अमरावतीत शरद पवार यांच्या संवाद बैठकीत पाच जिल्ह्याचे पदाधिकारी हजर राहतील. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे, मनोहर नाईक, एकनाथ खडसे यांच्यासह पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्याचे प्रमुख नेते पदाधिकारी हे उपस्थित राहतील.
या संवाद बैठकीत 2 हजार लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवेश पत्र असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. पश्चिम विदर्भात जनाधार का वाढत नाही याचं चिंतन या बैठकीत केलं जाणार आहे. मुंबई येथे सिल्वर ओक येथे झालेल्या प्रकारामुळे या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आला आहे.
ADVERTISEMENT