ज्या राज्यांमध्ये आपल्या विचारधारेची सरकारं नाहीत, तिथं ईडी, सीबाआय मागे लावून, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी फोडून भाजपचं सरकार स्थापन करण्याचा उपक्रम केंद्रातील सरकारकडून राबवला जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. बिगर भाजपशासित राज्यातील सरकार पाडल्याचा आरोप करतानाच शरद पवारांनी यादीच वाचून दाखवली.
ADVERTISEMENT
शरद पवार आज (२९ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी थेट केंद्र सरकार आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर गंभीर आरोप केले.
विरोधकांविरोधात भाजपकडून ईडी, सीबीआयच्या वापर; शरद पवार नेमकं म्हणाले?
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि राज्यातील सत्ता पाडण्याबद्दल पवार म्हणाले, “राजकीय नेतृत्वाकडून काही ना काही कारणातून कुणावर खटले, कुणामागे ईडी, कुणामागे सीबीआय लावता येईल का, हे प्रकार सुरु आहेत. हे महाराष्ट्रातच नाहीये. गुजरात, झारखंडमध्येही याच तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी आज केंद्रात ज्यांची सत्ता आहे, पण राज्यात त्यांची सत्ता नाहीये, अशा ठिकाणी सत्तेवर असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करायचं. हाही एक उपक्रम भाजपनं अनेक राज्यांमध्ये ज्याठिकाणी बिगर भाजपची सरकार आहे, तिथे घेतला गेला.”
“कर्नाटक. कर्नाटकात आज भाजपचं सरकार आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार नव्हतं. सरकारमधील लोक फोडून त्यांच्या मदतीने भाजपनं सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात शिवसेनेतला एक वर्ग बाजूला केला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार पाडलं. तिथे भाजपचं सरकार आणलं गेलं. हे चित्र आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतंय”, असं शरद पवार म्हणाले.
आमदारांना आमिष देऊन बाजूला केलं जातंय; भाजपवर शरद पवारांचा गंभीर आरोप
“लोकांनी सत्ता दिली नाही, तर लोकांनी दिलेल्या सदस्यांना फोडून, आमिष दाखवून त्यांना बाजूला करून सत्ता हातामध्ये घ्यायची, हे सूत्र भाजपनं केलेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं दिसतंय की, देशामध्ये राज्यांच्या राज्य सरकार स्थापन करण्याची केव्हा संधी मिळेल, यावर त्यांचा विश्वास नाहीये. अलिकडेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. केरळमध्ये बिगर भाजपशासित राज्य आहे. तामिळनाडूत बिगर भाजपशासित सरकार आहे. कर्नाटकात बिगर भाजपशासित राज्य होतं. आंध्र प्रदेशात बिगर भाजपशासित सरकार आहे. महाराष्ट्रात बिगर भाजपचं सरकार होतं. मध्य प्रदेशात, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही बिगर भाजप पक्षाची सरकार आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
“मोजकी राज्य सोडली, तर भाजपकडे राज्यांची सत्ता नव्हती. लोकांनी दिलेली नव्हती. लोकांचं मत त्या पक्षाविषयी काय होतंय, त्याची ही परिस्थिती आहे. माणसं फोडणं, साधनांचा वापर करणं, ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करून सत्ता काबीज करणं, हे दुर्मिळ चित्र आज देशात दिसतंय. हे आव्हान आहे. देशातील बिगर भाजप पक्षे आहेत. त्यांच्याशी संवाद साधतोय. अशा पद्धतीने जी सरकार आणली जात आहे, त्याविरोधात जनमत तयार करण्याचं काम करण्याचं आवाहन या पक्षांना करतोय”, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
ADVERTISEMENT