Sheetal Mhatre Latest News: शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी शनिवारी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी ही तक्रार दाखल केली असून, व्हिडीओ मॉर्फ (मूळ व्हिडीओशी छेडछाड) करून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे. (Sheetal Mhatre Prakash Surve morphed video goes viral)
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे हे शनिवारी मध्यरात्री अचानक कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस ठाण्यात गेल्यानं चर्चा सुरू झाली. शीतल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रकरण समोर आलं. शीतल म्हात्रे यांनी एका व्हिडीओतून संबंधित प्रकाराबद्दल भूमिका मांडली असून, ठाकरे गटावर टीका केली आहे.
शीतल म्हात्रेंची पोलीस ठाण्यात तक्रार, प्रकरण नेमकं काय?
भाजप-शिवसेना युतीच्या वतीने मुंबईत आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. सहा लोकसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जाणार असून, शनिवारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा यात्रेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ मॉर्फिंग करून आणि अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे.
शिवसैनिकांना रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ घालणाऱ्या शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे गटात
फेसुबकवर मातोश्री नावाच्या पेजवरून आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंनी तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाईही सुरू केली आहे.
“हा व्हिडीओ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला”, शीतल म्हात्रेंनी मांडली सविस्तर भूमिका
या प्रकरणावर शीतल म्हात्रे यांनी एका व्हिडीओतून स्वतःची भूमिका मांडली. शीतल म्हात्रे म्हणाल्या, “आज मी कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी”, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
“राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले, तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी यानिमित्ताने ठाकरे गटाल केला आहे.
ADVERTISEMENT