(Eknath shinde faction mla Abdul Sattar News)
ADVERTISEMENT
मुंंबई : नागपूर अधिवेशनात शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार विरोधकांच्या रडारवर आले. त्यामुळे त्यांची विकेट जाणार अशी चर्चाही सुरू झाली. राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांत ठाकरे गट आघाडीवर होता. पण आता सत्तारांनी आपली विकेट काढण्यासाठी शिंदे गटातूनच खेळी खेळण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला.
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सव आणि वाशीममधील गायरान जमिनीवरून आरोप होत आहेत. त्यामुळे नागपूर अधिवेशन काळात सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले. याबद्दल विधानसभेत सत्तारांनी सरकारी चौकटीत उत्तरही दिलं. पण आता अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी सत्तारांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. मात्र हा पलटवार महाविकास आघाडीवर किंवा ठाकरे गटावर नाही, तर आपल्याच पक्षातल्या लोकांवर केला आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तारांनी माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला. याच गौप्यस्फोटानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सत्तार नेमकं काय म्हणाले?
मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. यात माझ्या पक्षातीलही काही लोक असू शकतात. तर विरोधी पक्षातही माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक समाजातला व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना बघवलं जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार म्हणाले.
आमच्या पक्षाच्या बैठकीमधील बातम्या बाहेर येत आहेत. मागे आमची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत काय झाले हे बाहेर आले. विशेष म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्यादेखील बाहेर आल्या. आपल्यातीलच कुणीतरी आतल्या गोष्टी बाहेर पुरवत असल्याचं मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं असून, चौकशीची मागणीही केली असल्याचं सत्तार म्हणाले.
सत्तार यांच्या याच गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच शिंदे गटातलं कुरघोडीचं राजकारण यानिमित्तानं चव्हाट्यावर आलं. तसंच सत्तारांनी नाव न घेता यामागे मंत्रिपद न मिळालेला आमदार असल्याचं सांगत अंगुलिनिर्देशही केला. शिंदे गटातही सारं काही आलबेल नाही, हेच सत्तार प्रकरणावरून दिसलं. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे वेळीच हे प्रकार रोखतात की काय करतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT