बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोर जावं लागलं. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीत संतप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांचा ताफा अडवून गाडीवर हल्ला केला. शिवसैनिकांकडून हल्ला झाला त्यावेळी संतोष बांगर हे चालका शेजारच्या सीटवर बसलेले होते. या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे संतोष बांगर आले होते. यावेळी काही संतप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांची गाडी अडवली.
संतोष बांगर यांच्यासोबत नक्की काय घडलं?
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे अंजनगाव सुर्जी येथे आले. रस्त्यावरून त्यांचा ताफा जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीसमोरची पोलिसांची गाडी जाऊ दिली. त्यानंतर संतोष बांगर यांच्या गाडीसमोर शिवसैनिक आले. यावेळी संतोष बांगर चालक शेजारी असलेल्या समोरच्या सीटवर बसलेले होते. काही शिवसैनिकांनी बांगर यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला.
संतोष बांगर यांच्या गाडीला शिवसैनिकांनी घेराव घालत काचा फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी तातडीने गाडी पुढे पळवली. त्यामुळे संतोष बांगर शिवसैनिकांच्या हल्ल्यातून बचावले.
‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा
शिंदे गटातील आमदार संतोष बांगर याची गाडी अडवताना शिवसैनिकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. ५० खोके एकदम ओके अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या आणि नंतर गाडीवर हल्ला केला. थोड्या अंतरापर्यंत शिवसैनिक संतोष बांगर यांच्या गाडीमागे धावत गेले.
संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला; कोणताही गुन्हा नाही
अंजनगाव सुर्जीत संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. मात्र, या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मुंबई तकच्या प्रतिनिधी अंजनगावचे पोलीस ठाणे प्रमुख दीपक वानखेडे यांच्याशी संपर्क केला. अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT