Rane यांच्या बंगल्याबाहेर प्रचंड राडा; सेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांचा लाठीमार

सौरभ वक्तानिया

• 07:15 AM • 24 Aug 2021

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. सुरुवातीला राणेंविरोधात बॅनरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांनी थेट राणेंच्या मुंबईतील जुहू येथील घरासमोर जाऊन प्रचंड राडा घातला. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला आव्हान दिलं होतं की, ‘सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. सुरुवातीला राणेंविरोधात बॅनरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांनी थेट राणेंच्या मुंबईतील जुहू येथील घरासमोर जाऊन प्रचंड राडा घातला.

हे वाचलं का?

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला आव्हान दिलं होतं की, ‘सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका.’ ज्यानंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर धडक दिली.

येथे पोहचताच शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. दुसरीकडे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर भाजपचे देखील अनेक कार्यकर्ते होते. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने येताच एकमेकांना भिडले. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाल्या.

दरम्यान, येथील परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी राडेबाजांवर जोरदार लाठीहल्ला केला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील कार्यकर्त्यांना पांगविण्यात आलं. याचवेळी अनेकांनी नितेश राणे यांनी बंगल्याबाहेर यावं असं आव्हान देखील दिलं. या सगळ्यामुळे जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. नारायण राणे असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना?’

‘मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.’ असं नारायण राणे म्हणाले होते.

मला मारण्याची धमकी पोलीस देत आहेत, वाट अडवली-Nitesh Rane

राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा अक्षरश: स्फोट झाला आहे. राणेंच्या वक्तव्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत.

दुसरीकडे नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी राणेंना अटक करण्यासाठी एक पथक रवाना झालं असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राणेंना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

याशिवाय मुंबईसह पुणे, नाशिक आणि राज्यातील अनेक ठिकाणी राणेंविरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात येत आहेत. ही यावेळी काही ठिकाणी राणेंची पोस्टर जाळण्यात आली आहे. तर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे.

    follow whatsapp