शिवसेनेतल्या फुटीनंतर पार पडणाऱ्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. सुरुवातीलाच ठाकरेंनी शिवसैनिकांचे आभार मानले. त्यानंतर एकनाथ शिंदेंना ‘एक’टा म्हणत शिंदे गटावर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि ते दसरे मेळावे माझ्या आजही लक्षात आहे. पण, असा दसरा मेळावा फार क्वचित झालाय. अभूतपूर्व. मनापासून सांगतो, मी भारावून गेलोय. भाषणासाठी खूप मुद्दे आहेत. मी खरंच किती बोलू शकेन. तुमचं प्रेम पाहून मुद्दे असले, तरी शब्द सुचत नाहीयेत. हे विकत मिळत नाही. हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाहीये. ही अंतःकरणात ओल असलेल्या माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे”, असं उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले.
“प्रथम मी आपल्यासमोर नतमस्तक झालो. याच शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून नतमस्तक झालो होतो. कोणताही अनुभव नव्हता. पाठिशी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद होते. त्या जोरावर अडीच वर्ष कारभार करून दाखवला. आजसुद्धा अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही”, असं म्हणत ठाकरेंनी उपस्थितांचे आभार मानलेत.
शिवसेना दसरा मेळावा २०२२ : उद्धव ठाकरे शिंदे गटाबद्दल काय म्हणालेत?
“हेच ते प्रेम आहे, आशीर्वाद आहेत. संकटात सुरक्षेचं कड केलं. शिवसेनाप्रमुख जे सांगायचे, ते मी अनुभवतोय. ज्यावेळी शिवसेनेत गद्दारांनी गद्दारी केली. होय, गद्दारचं म्हणणार. कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण, कपाळावर गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसता येणार नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं.
“त्यावेळी अनेकांना असा प्रश्न पडला होता की, आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. कारण ज्याने हे कार्य सोपवलंय, तो बघून घेईन. आज शिवतीर्थ बघितल्यानंतर पुन्हा त्यांच्या मनात प्रश्न पडला अरे बापरे गद्दारांचं कसं होणार? इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. यापैकी कुणीही… माझ्या माता भगिनींना विचारा… लोक चालत आलेत. त्यांना विचारलं तर ते सांगतील की, तितके ‘एक’टा आहे, इकडे एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ सगळे माझ्यासमोर बसले आहेत. जे मला शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलंय”, असं उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले.
“ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. दरवर्षी परंप्रमाणे दसरा मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. पण यंदाचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो, तसा रावणही बदलतो. आतापर्यंत दहा तोंडांचा होता. आता डोक्यांचा नाही, खोक्यांचा खोकासूर आहे. धोकासूर आहे”, असं म्हणत ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT