मुंबईतल्या दोन मैदानावर होत असलेले मेळाव्यांकडे सगळ्यांच्याचं नजरा लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत असून, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क होणार आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी सुरू असून, आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एक विधान केलंय.
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे असो वा उद्धव ठाकरे. दोन्ही नेत्यांना दसरा मेळाव्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची संधीच मिळालीये, असंच दिसतंय. कारण दोन्ही गट अधिकाधिक गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करताना दिसताहेत. शिंदे गटाने राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबई येण्यासाठी एसटी बसेस आणि इतर गाड्यांची व्यवस्था केलीये. याच मुद्द्यावर बोलताना भास्कर जाधवांनी विधान केलं.
भास्कर जाधव शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “1800 गाड्या बुक केल्या, त्यांना पैसे भरावे लागतातच. ज्यांना सुरतला जाण्यासाठी, गुवाहाटीला जाण्यासाठी पैशांची कमतरता पडली नाही. त्यांना महाराष्ट्रातल्या एसटी महामंडळाला भरण्यासाठी पैसे कसे कमी पडतील?”, असा प्रश्न भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय.
दसरा मेळावा : शिंंदेंच्या शिवसैनिकांसाठी प्रताप सरनाईकांकडून शाही मेजवानीची व्यवस्था
“त्यांनी जेव्हा शिवसेनेशी विश्वासघात केला. तेव्हा ५० खोके एकदम ओके, अशी घोषणा महाराष्ट्रात आणि देशात गाजलीये. त्यांनी कितीही गाड्या करू द्या. कितीही घोषणा करू द्या. महाराष्टातल्या जनतेनं हे ठरवलं आहे की, ज्याने ५० खोके घेतले आहेत, विश्वासघाताने घेतलेले असल्यानं त्यांच्यांच गाडीतून जायचं आणि मुंबईला उतरल्यानंतर शिवतीर्थावर जायचं. कारण ज्यांनी विश्वासघात केलाय त्यांची थोडीफार फसवणूक केली, तर त्याला विश्वासघात म्हणता येणार नाही”, असं भास्कर जाधव म्हणालेत.
दसरा मेळावा 2022 : उद्धव ठाकरेंचं सगळं प्लानिंग ठरलं! शाखाप्रमुख, नेत्यांकडे मोठी जबाबदारी
शिंदे गटाने कार्यकर्त्यांच्या प्रवासाबद्दल केलेल्या व्यवस्थेविषयी बोलताना भास्कर जाधवांनी शिवसैनिक शिंदे गटाच्या वाहनातून येतील, पण उद्धव ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहतील असं म्हटलंय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं प्लानिंग नेमकं काय झालंय? असा प्रश्न या विधानामुळे झालाय.
ADVERTISEMENT