केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं स्वागत भाजपचे नेते सुनील देवधर यांनी केलं. सुनील देवधर यांनी नारायण राणे यांना महावस्त्र देऊन त्यांचा सत्कार केला. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेऊन सुनील देवधर यांनी नारायण राणे यांचा सत्कार केला. यासंदर्भातला फोटो देवधर यांनी ट्विटही केला आहे. ज्या फोटोवरून शिवसेनेने नारायण राणे यांची खिल्ली उडवली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे शिवसेनेने?
शिवसेनेच्या सविता पाटील यांनी नेसली रे माहेरची साडी.. हसू नका रे असं कॅप्शन देऊन हा फोटो फेसबुक पोस्टवर टाकला आहे. शिवसेना मुंबई या पेजवर हा फोटो या कॅप्शनसहीत होता जो डिलिट करण्यात आला आहे. मात्र याबाबत आता भाजपच्या आमदार मेघना बोर्डिकर यांनी हा स्त्रियांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे मेघना बोर्डिकर यांचं ट्विट?
सन्मानीय उद्धवजी, आपल्या शिवसेनेला आता हिंदू देव-देवता, त्यांची पवित्र वस्त्रे यांच्याशी काही देणेघेणे राहिलेले दिसत नाही. श्री बालाजींच्या महावस्त्राची तुलना साडीसोबत करून आपण महिलांचाही अवमान करतोय, याचेही भान राहिले नाही. ही सेना ती राहिली नाही हेच खरे. असं म्हणत सविता पाटील यांच्या पोस्टला मेघना बोर्डिकर यांनी उत्तर दिलं आहे.
नारायण राणे आणि शिवसेना हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाराष्ट्रात पूर परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेव्हा कोकण दौऱ्यावर आले होते तेव्हा तिथे अधिकारी नव्हते. त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला. मुख्यमंत्री आलेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं उत्तर अधिकाऱ्याने फोनवर दिल्यानंतर सीएम बीएम गेला उडत असं उत्तर देत नारायण राणेंनी त्या अधिकाऱ्याला झापलं होतं. हा व्हीडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी ते जाऊदे.. एवढं म्हणत नम्रपणे बोलण्यास नकार दिला होता. आता नारायण राणेंचं सुनील देवधर यांनी केलेलं स्वागत आणि त्यानंतर समोर आलेली शिवसेनेची प्रतिक्रिया आणि त्याला भाजपने दिलेलं उत्तर हे दोन्हीही चर्चेत आहे.
ADVERTISEMENT