राकेश गुडेकर/भरत केसरकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग: ‘राज ठाकरे हे एक करमणुकीचे केंद्र आहे, आणि त्यांचा मनसे पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे, मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे.’ अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
‘बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ते उत्तम काम करत आहेत. हे राज ठाकरे यांना पाहवत नाही. याबाबत देखील त्यांना बंधूद्वेष असून त्यातून हा थयथयाट सुरु आहे.’ अशी देखील बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज (3 मे) रत्नागिरीत बोलत होते.
आज रत्नागिरीत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अक्षय तृतीयेच्या देखील शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी राऊत म्हणाले की, ‘कायदा आणि सुव्यवस्था बघडविण्याचा डाव मनसे आणि भाजपचा आहे. पण त्याला महाराष्ट्रची जनता भीक घालणार नाही.’ अशीही टीका देखील विनायक राऊत यांनी भोंगाप्रश्नी केली आहे.
‘राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीमत्वाचा जो अवमान केलेला आहे, त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही.’ असा इशारा देखील खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तुफान टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘सध्या देवेंद्र फडणवीस यांना मोठी मोठी स्वप्न पडतात आणि काही भूतकाळातील गोष्टी आठवतात, त्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धातील देखील आपला सहभाग जाहीर करावा.’ अशी उपरोधिक टीका विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, या देवेंद्र फडणवीसाच्या वक्तव्याचा खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे. 29 वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसांना अक्कल दाढ आली का? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.
संपूर्ण देशाला माहिती आहे, ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा भाजपचे सर्व वरीष्ठ नेते शेपूट घालून पळत होते. ढसाढसा रडत होते. त्यावेळी बाळासाहेबांनी बाबरी मशीद पाडणाऱ्यांना आधार दिला. मुख्यमंत्री होत नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत.
राज ठाकरेंकडून नियमांचा भंग?, गृहमंत्री वळसे-पाटलांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक
‘नवनीत राणांना कायदा शिकवण्याची गरज होती’
खासदार नवनीत राणा यांच्याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, ‘राज्यात कायद्याचे राज्य आहे. राणा यांनी उद्धव ठाकरे यांना काय शब्द वापरले आहेत हे पोलीस यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कायदा काय आहे हे नवनीत राणा यांना शिकविण्याची आवश्यकता होती आणि कायद्याच्या रक्षकांनी दाखवून दिलेलं आहे.’ अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT