केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रविवारी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात राजकारणापासून दूर जाण्याबद्दल एक विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन शिवसेनेनं सद्यस्थितीवर भाष्य केलंय. ‘सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असह्य होत आहे, पण करायचे काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं सामनातून उपस्थित केलाय.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलंय की, “गडकरी यांचं नागपूरचं भाषण सगळ्यांनाच विचार करायला लावणारं आहे. सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे, अशी निरवानिरवीची भाषा गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे.”
“सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत. त्यांना जे चालले आहे ते असह्य होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे.”
राजकारण कधी सोडू अन् कधी नये असं झालंय; नितीन गडकरी यांचं मोठं विधान
“गडकरी हे स्वतःला सध्याच्या राजकारणात फिट मानत नाहीत. सभोवती गारद्यांचा गराडा आहे व हाती अनीतीच्या तलवारींचा खणखणाट सुरू आहे. त्यामुळे अस्वस्थ गडकरींनी नागपुरात मन मोकळे केले असे दिसते. गडकरी यांनी गांधी काळातील राजकारणाचा उल्लेख केला, पण भारतीय जनता पक्षाला गांधी विचार मान्य नाहीत. तरीही गडकरी गांधींचा संदर्भ देतात हे महत्त्वाचं,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर शिवसेनेची टीका
“पूर्वी समाजकारणासाठी लोक राजकारणात येत होते, आज तसे नाही. ज्याला आमदार, खासदार, मंत्री व्हायचे आहे, गेलाबाजार मुख्यमंत्री व एखाद्या महामंडळाचे सदस्य व्हायचे असते अशी व्यक्ती राजकारणात येते. काही जण तर सर्व काही मिळून व मिळवून स्वजनांशी द्रोह करतात. अनेक जण इकडून तिकडे उड्या मारतात. आईचेच दूध बाजारात विकणारी औलाद सध्याच्या राजकारणात निर्माण झाल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केलेली दिसते,” असं म्हणत शिवसेनेनं शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर निशाणा साधला आहे.
नितीन गडकरी यांच्या संस्थांवर ईडीच्या धाडी
“सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गडकरी हे सगळ्यात अनुभवी व कार्यक्षम मंत्री आहेत. राजकीय सूडबुद्धीने वागणारे ते नेते नाहीत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे समाजकारण टिकले तरच राजकारण टिकेल या भूमिकेवर ते ठाम आहेत. अत्यंत लहान वयात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा त्यांच्याविरुद्ध कुभांड रचून रोखण्यात आलं.”
“गडकरी यांच्या अनेक संस्थांवर तेव्हा ‘ईडी’सह तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या, त्यांना बदनाम केलं गेलं. गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळाली असती तर देशाचा राजकीय इतिहास पूर्णपणे बदललेला दिसला असता. गडकरी तेव्हापासून अस्वस्थच आहेत. त्यांची अस्वस्थता अधूनमधून व्यक्त होत असते, पण त्यासाठी व्यासपीठ नागपूरचेच असते हे विशेष,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT