शिवसेनंचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. मागच्या ५६ वर्षांपासून एकसंध असलेली शिवसेना फुटली आहे, दुभंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंतचं शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं आहे. ४० आमदारांना घेऊन त्यांनी हे बंड पुकारलं.
ADVERTISEMENT
दरम्यान या सर्व घडामोडींनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदेंचा उल्लेख गारदी असा करण्यात आला असून त्यांच्यामुळे शिवसेना संपणार नाही असंही म्हटलं गेलं आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
शिवसेनेला संपवणं कुणालाही जमलं नाही, तेव्हा एकनाथ शिंदे या गारद्याची नेमणूक त्या कामी झाली. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला. एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत. असा दानव हिंदुस्थानाच्या इतिहासात पाच हजार वर्षात झाला नसेल. निवडणूक आय़ोगाने शिवसेनेच्या अस्तित्वावर घावल घालण्याचा प्रयत्न करताच दुष्टकर्मा अफझलखानाप्रमाणे दाढीवर ताव मारत विकट हास्य केलं असेल.
शिवसेनेच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत असा दुष्टपणा करणाऱ्या गारद्यांना नरकातही जागा मिळणार नाही. महाराष्ट्रासाठी हौतात्म पत्करलेले १०५ हुतात्मे, शिवसेनेसाठी मरण पत्करलेले असंख्य त्यागी वीरपुरूष आकाशातून या गारद्याला शापच देत असतील. निवडणूक आयोगाने शिवसेनेवर घातलेल्या गारदी घावाने शिंदेंच्याइतकाच पाकिस्तानही खुश असेल. महाराष्ट्राचा प्रत्येक दुष्मन आनंदी असेल. मात्र स्वतःच्या आयुष्याचं शिंपण करून शिवसेना नावाचा अंगार निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मात्र आज वेदना आणि दुःख हो असेल त्याचे काय?
एकनाथ शिंदे यांनी पाप केलं आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस गारदी बाळासाहेब ठाकरेंच्या शापाने कायमचे मातीमोल होतील. कोणी कितीही कट-कारस्थानं केली, बेइमानीचे घाव घातले तरीही शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. तसंच शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा आदेशही काढला. दिल्लीने हे पाप केलं. बेइमान गारद्यांनी अशीच बेइमानी केली होती. आम्ही शेवटी इतकंच सांगतो कितीही संकटं येऊ उद्या त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच.
ADVERTISEMENT