काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या एका विधानावरून वाद सुरू झालाय. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ‘जिहाद फक्त कुराण शरीफमध्येच नाही, महाभारतातल्या गीतेमध्येही आहे. श्रीकृष्णाने अर्जूनाला जिहादची गोष्ट सांगितलीये, असं विधान शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय. यावरून भाजपनं काँग्रेसवर टीका केलीये.
ADVERTISEMENT
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते मोहसीना किडवई लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. दिल्लीत झालेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर यांनी पुस्तकाबद्दल भाष्य करताना जिहादबद्दलही भाष्य केलं.
‘श्रीकृष्णाने अर्जूनाला जिहादची गोष्ट सांगितली’; शिवराज पाटील चाकूरकर नक्की काय म्हणालेत?
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, “इस्लाममध्ये जिहादची खूप चर्चा झालीये, असं म्हटलं जातं. आता संसदेत आम्ही जे काही काम करतोय, ते जिहादच्या अनुषंगाने नाहीये. आम्ही विचाराच्या अंगाने काम करतोय.”
“जिहादची गोष्ट कधी कधी येते. जिहादचा मुद्दा तेव्हा येतो, जेव्हा मनात चांगले विचार असतील, त्यासाठी प्रयत्न करूनही जर कुणी समजून घेत नाही. करत नाही. आणि त्यावेळी म्हटलं जातं की तुम्हाला शक्तीचा वापर करायचा असेल, करायला पाहिजे”, असं मत शिवराज पाटील चाकूरकर यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केलं.
शिवराज पाटील पुढे म्हणाले, “आणि हे कुराण शरीफमध्येच नाहीये. ते महाभारतात जो गीतेचा भाग आहे, त्यातही श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादची गोष्ट सांगतात. ही गोष्ट फक्त कुराण शरीफ आणि गीतेमध्ये आहे असं नाहीये. जे ख्रिश्चन लोकांनी लिहिलंय. जीजस क्राईस्टने लिहिलंय. त्यांनी म्हटलंय की ‘मी फक्त शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेलो नाहीये, तर तलवारही घेऊन आलोय.’ त्यांनी लिहिलंय”, असं विधान शिवराज पाटील चाकूरकर यावेळी केलं.
“म्हणजे सगळं काही समजून सांगण्याचा प्रयत्न करूनही जर समजत नसतील. आणि तो शस्त्र घेऊन येत असेल, तर तुम्ही पळून नाही जाऊ शकत नाही. तुम्ही त्याला जिहादही म्हणू शकत नाही आणि चुकीचंही म्हणू शकत नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. शस्त्र घेऊन समजून सांगण्याची गोष्ट व्हायला नको. पण असं झालेलं नाही. मोहसीना किडवई यांनी या पुस्तकात हेच म्हटलं आहे”, असं शिवराज पाटील चाकूरकर म्हणालेत.
शिवराज पाटलांच्या विधानावरून भाजपची काँग्रेसवर टीका
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विधानावरून भाजपनं काग्रेसला लक्ष्य केलंय. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी ट्विट करत टीका केलीये. ‘याच काँग्रेसने हिंदू दहशतवादाची संकल्पनेला जन्म दिला. राम मंदिराचा विरोध केला होता. त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसचा हिंदूबद्दलचा द्वेष हा योगायोग नाहीये, तर व्होटबॅंकेचा एक प्रयोग आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी जाणीवपूर्वक धुव्रीकरण करण्यासाठी हा मुद्दा उचलण्यात आलाय’, असं शहजाद पूनावाला यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT