बुलढाणा : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात राज्यभरात निदर्शन करण्यात येत आहेत. मुंबईत सत्तार यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या बंगल्याचीही तोडफोड करण्यात आली. सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरु लागली आहे.
ADVERTISEMENT
अशातच आज (सोमवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जात आहेत. आज संध्याकाळी आदित्य ठाकरे तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्यापूर्वीच सत्तार यांनी सुळेंबद्दलचे विधान करुन एकप्रकारे आदित्य ठाकरेंच्या हातात आयतं कोलीत दिलं आहे. सत्तारांविरोधात ठाकरे गटही वातावरण तापवणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सिल्लोडमध्ये पोहचण्यापूर्वीच दाखवून दिलं आहे.
सिल्लोडमध्ये पोहचण्यापूर्वी आदित्य ठाकरे बुलढाण्यात होते. यावेळी त्यांनी सत्तार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, या राज्याचे घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. अब्दुल सत्तार त्यांचं नाव. या मंत्रिमहोदयांनी सुप्रिया सुळेंसाठी एवढा घाणेरडा शब्द वापरला, एवढा घाणेरडा शब्द वापरला की तो मी उच्चारुही शकत नाही एवढा घाणेरडा शब्द होता. आज माझा थेट प्रश्न केंद्र सरकारला विचारत आहे की अशी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात तुमच्या सोबत हवी आहेत का?
मागील काही दिवसांपासून शिंदे गट त्यातही अब्दुल सत्तार आणि ठाकरे गट यांच्यातील संबंध चांगलेच चर्चेत राहिले आहेत. आधी ४० आमदारांवर टीका, मग ५० खोक्यांचा आरोप यामुळे शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले होते. अशाच छोटा पप्पू म्हणतं सत्तार यांनी आदित्य ठाकरेंची हेटाळणी केली. तसंच मतदारसंघात येवून सभा घेऊन दाखवा असं आव्हानही सत्तार यांनी दिलं होतं.
ADVERTISEMENT