नागपूर : शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी (26 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनाचं कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे अधिवेशन 2 आठवड्यांचं असल्यानं शुक्रवारपर्यंत अधिवेशनाच कामकाज चालणार आहे. याच 5 दिवसांतील महाविकास आघाडीची पुढील राजकीय रणनीती ठरविण्यासाठी आणि ताकद वाढविण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नागपूरमध्ये दाखल होणार आहेत.
ADVERTISEMENT
रविवारी (25 डिसेंबर) रात्री 11 वाजता उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हे विषेश विमानाने नागपूरमध्ये येणार आहेत. सोबत युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे देखील असल्याचं सांगितलं जात आहे. याच नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी उद्या नागपूरमध्ये अनेक बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिवेशानचे पाच दिवस वादळी होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-बाळासाहेबांची शिवसेना असा जोरदार सामना पाहायला मिळाला. बेळगावचा सीमवाद आणि त्यावरील सरकारची भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील भूखंड प्रकरणातील आरोप यामुळे महाविकास आघाडीनं शिंदे सरकारविरोधात वातावरण तापलं होतं. अशातच दिशा सालियन प्रकरण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे महाविकास आघाडीविरोधात वातावरण तापलं.
काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेनाचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत बोलताना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार आरोप केले. तोच मुद्दा उचलून महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सभागृहात बराच गदारोळ घातला.
दिशा सालियान प्रकरणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. साटम यांच्या मागणीला इतरही आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे दोनदा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. याच मुद्दावर बोलू न दिल्यानं जयंत पाटील यांनी अध्यक्षांविरोधात असंसदीय टिपण्णी केली आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं. आता या सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काय रणनीती ठरणार, ते सभागृहातून उत्तर देणार की सभागृहाच्या बाहेरुन या सर्व गोष्टी सोमवारी पाहयाला मिळतील.
ADVERTISEMENT