शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यांच्यासोबत ४० आमदारही शिंदे गटासोबत गेले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू असतानाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासमोर जमलेल्या शिवसैनिकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
मातोश्रीच्या बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“राजकारणात हार-जीत होत असतेच. मात्र संपवण्याची भाषा कधीही कुणी करत नाही. मात्र भाजपच्या अध्यक्षांच्या तोंडून ती भाषा बाहेर आली. आपली लढाई दोन-तीन पातळ्यांवर सुरू आहे. मात्र शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं. ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. त्यांना हा पक्ष नुसता फोडायचा नाही तर संपवायचा आहे.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आपली लढाई तीन पातळ्यांवर सुरू आहे. पहिली लढाई रस्त्यावरची आहे. या लढाईत आपण अजिबात कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. दुसरी लढाई कोर्टात सुरू आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. त्या लढाईत आपल्याला यश मिळेल.तिसरी लढाई तेवढीच महत्त्वाची आहे. ही लढाई आहे आपल्या शपथपत्राची आहे. हा विषय गंभीर आहे. आपली कायद्याची लढाई सुरू आहे. इथे येण्यापेक्षा आहात तिथे पाय रोवून उभे राहा. शिवसेनेला फोडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तसं कधीही घडणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला जे बंड केलं त्यानंतर शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. एक लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. तर दुसरी लढाई रस्त्यावर सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. कात्रजमध्ये या यात्रेनंतर उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला. त्यानंतर इतरही अनेक पडसाद या प्रकरणात उमटले आहेत. शिवसेनेत झालेलं बंड हे अभूतपूर्व आहे. कारण पहिल्यांदाच शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं तर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर एका पाठोपाठ एक धक्के एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना दिले जात आहेत. निवडणूक आयोगात या दोन्ही गटांना खरी शिवसेना कुणाची हे कागदोपत्री सिद्ध करायचं आहे. अशात आता आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपवणाऱ्यांच्या विरोधात पाय रोवून उभे राहा असं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT