राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातलं अंतर दिवसेंदिवस वाढत जातानाचं चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप नेत्यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलंय. कमी प्रतीचा गांजा मारल्यामुळेच भाजप नेत्यांना अशा कल्पना सूचतात अशी बोचरी टीका फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या जोडगोळीवर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कमी प्रतीचा गांजा आणि बेताल बडबड –
भाजप व त्यांचं केंद्रातलं सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरं जात नाही. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्विकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यामुळेच अशा कल्पना सुचत असाव्यात. दसरा मेळाव्यामधलं उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलं नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांचा चिलमीत जास्तीचा गांजा भरुन दम मारो दम करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा हा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते.
आक्षेप घेणारे फडणवीस आणि पाटील कोण?
भाजपने बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे अशी अलोकशाही भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते पण ते स्वतःच झाले, पण असा आक्षेप घेणारे फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कोण? उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी लाखोंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर वाजत गाजत शपथ घेतली. लोकं झोपेत आणि गुंगीत असताना लपून-छपून कड्या-कुलपात शपथ घेतली नाही हे काय विरोधी पक्ष नेत्यांना माहिती नाही?
याव्यतिरीक्त आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी, CBI-ED यासारख्या यंत्रणांचा गैरवापर, राज्य सरकारच्या अधिकारांचं हनन यासारख्या विषयांवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नेत्यांवरचा हल्ला हा समजू शकतो पण त्यांच्या कुटुंबियांचा छळ करुन भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवत आहेत.
भाजपचे लोकं दसरा मेळाव्यानंतर ज्या पद्धतीने भाजपचे लोकं शिमगा करत आहेत, बेताल आरोप करत आहेत ते बरं नाही. ही लोकं नशेत वगैरे बोलत आहे का याचा तपास व्हावा. भाजपने महाराष्ट्रातली सत्ता गमावून दोन वर्ष झाली, त्या धक्क्यातून त्यांनी आता सावरायला हवं. एक आण्याचा गांजा मारला की भरपूर कल्पना सूचतात असं लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आजही भाजप नेत्यांची जी भन्नाट मुक्ताफळे आणि शिमगोत्सव सुरु आहे त्यामागे लोकमान्यांना सांगितलेले गांजापुराण आहे काय? NCB ने याचा तपास करावा, असा सल्ला आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय.
यानंतर सरकार कधी गेले कळणारही नाही या फडणवीसांच्या वक्तव्याचाही आजच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. बेछूट आणि बेफाम आरोप करायचे हेच विरोधी पक्षनेत्याचे काम नसते. फडणवीसांचं वक्तव्य हे त्यांचा अहंकार आहे. आपलं मुख्यमंत्रीपद कसं गेलं हेच त्यांना अजून कळू शकलं नाही. त्यामुळे फडणवीस आणि पाटील जे बोलतात ते किती गांभीर्यावने घ्यायचे हा देखील प्रश्नच आहे असंही शिवसेनेने म्हटलंय.
ADVERTISEMENT