मुंबई : महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत ४०० किमी रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा जंबो घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी केला. शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेत महापौर नसताना, कोणताही लोकप्रतिनिधी नसताना कोणाच्या परवानगीने प्रशासकांनी यासाठीचे टेंडर दिले, असा सवालही यावेळी ठाकरे यांनी विचारला.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबईतील रस्त्यांसाठी टेंडर काढण्यात आली. पण अपेक्षित प्रतिसादाआभावी ही टेंडर स्क्रॅप करण्यात आली. आता पुन्हा हे टेंडर काढण्यात आलं. पाच कंपन्यांना हे टेंडर मिळालं. साधारणपणे ४०० किमी रस्ते कॉंक्रिटीकरणाचे ६ हजार कोटींच्या घरातील हे टेंडर आहेत.
आता यांनी आता वर्क ऑर्डर दिलेलं आहे. पण मुंबईत काम करण्यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ मे हा योग्य वेळ असतो. रस्त्यांच्या खाली ४२ वेगवेगळे घटक असतात. त्यासाठी १६ एजन्सीजची परवानगी घ्यावी लागले. त्यांना माहिती द्यावी लागते. ट्राफिक पोलिसांचे ना हरकर प्रमाणपत्र गरजेचं असतं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जरी काम सुरु केलं तरी ते मे पर्यंत कसं पूर्ण होऊ शकणार आहे? ४०० किमीचे रस्ते खोदून ठेवणार आहे का? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मार्च २०२२ पर्यंत प्रस्तावित रक्कमेपेक्षा २५ टक्के कमीचं कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलं जातं होतं. म्हणजे साधारण १०० रुपयांचं काम असेल तर ते ७५ ते ८० रुपयांचं ते काम होऊ शकते, असं कॉंट्रॅक्ट स्वीकारलं जातं होतं. पण आता बिल्डरांचा ४८ टक्क्यांचा फायदा करुन देण्यात आला आहे. महापालिकेत कोणतीही बॉडी आणि महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने ही कामे मंजूर कशी केली? हा खूप मोठा प्रश्न आहे. टेंडरचा हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. कामाची समज नसतानाही टेंडर काढण्यात आलं, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
स्वतःला विकलं, मुंबईला विकू नका : आदित्य ठाकरे
यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोके सरकार हे मुंबईला एटीएमप्रमाणे वापरत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, टेंडरचा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत एका उत्तरात सांगितलं की अडीच हजार कोटींच्या कामाला ३ वर्ष लागलीत. मग हे ६ हजार कोटींच्या कामाला किती वर्ष लागतील? हे आता बिल्डर आणि कॉन्टॅक्टर सरकार झालं आहे. पण माझी विनंती आहे की, तुम्ही स्वत:ला विकलेलं आहे, माझी मुंबई विकू नका, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
ADVERTISEMENT