रत्नागिरी: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आज कोकण दौऱ्यावरती होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव देखील उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधवांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ते सकारात्मक असतील तर आम्हीही सकारात्मक राहू, आणि राहिलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर दिली आहे.
ADVERTISEMENT
हे गतिमान सरकार आहे आणि आम्ही विरोधकांना एकत्र घेऊन हे सरकार चालवू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, याबाबत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी परशुराम घाटातील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव देखील होते.
भास्कर जाधव काय म्हणाले?
भास्कर जाधव पुढे म्हणाले, कोकणाला बऱ्याच वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री मिळालेला आहे. त्यामुळे कोकणात जास्त मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असेल, आणि आमच्या मित्राने विरोधकांची मागणी न पाहता कोकणची मागणी आहे असा विचार करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
रविंद्र चव्हाण आमचे मित्र त्यामुळं…- भास्कर जाधव
तसेच जनतेची हीच इच्छा आहे की तुम्ही तुमच्या राजकीय फ्लोअरवर राजकारण करा, पण विकासाच्या वेळेला आपापले राजकीय जोडे बाजूला ठेवा, आणि विकासाकरिता सर्वांनी एकत्र या, रवींद्र चव्हाण हे आमचे मित्र आहेत ते जेव्हा सकारात्मक भूमिका घेतात, त्यावेळी आम्ही आमचं राजकारण बाजूला ठेवलंच पाहिजे, आणि कोकणच्या विकासाकरिता आम्ही एकत्र काम केलंच पाहिजे, असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज परशुराम घाटातील कामाची पाहणी केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या पाहणी दरम्यान शिवसेना आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती आहे.
ADVERTISEMENT